मराठी सिनेइंडस्ट्रीत १९८० ते १९९० चा काळ लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि प्रेक्षकांचा दीपक शिर्के (Deepak Shirke) यांनी गाजवला. त्यांच्याशिवाय तेव्हाचे चित्रपट पूर्णच होत नसत. त्यांनी 'थरथराट', 'दे दणादण', 'एक गाडी बाकी अनाडी', 'अग्निपथ', 'तिरंगा' यासारख्या बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. मात्र त्याची सुरुवातच लक्ष्मीकांत यांच्या मदतीने झाली होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर अभिनेता दीपक शिर्के यांच्यावर गंभीर परिणाम झाला. खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला.
एका मुलाखतीत दीपक शिर्के यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. या मुलाखतीत ते म्हणाले, लक्ष्मीकांत म्हणजे लाख माणूस. माझ्या व्यावसायिक आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यात त्याचे स्थान खूप महत्त्वाचे होते. त्याची आठवण आल्याशिवाय अजूनही एकही दिवस जात नाही. लक्ष्मीकांत सिनेमाच्या सेटचा प्राण असायचा. नुसता धुमाकूळ. तब्येतीने खायचा आणि खाऊ घालण्याचा त्याला मोठा शौक. मोठा रॉयल माणूस.
लक्ष्मीकांतमुळेच मिळालं 'टूर टूर' हे नाटक...ते पुढे म्हणाले की, लक्ष्मीकांतमुळेच मला 'टूर टूर' हे नाटक मिळालं. या नाटकापूर्वी मी कधीच कॉमेडी हा प्रकार हाताळला नव्हता. त्यामुळे एवढ्या दिग्गज लोकांसोबत स्टेज शेअर करताना मला खूप भीती वाटत होती. पण लक्ष्मीकांतनं आणि टीमनं मला बरंच सांभाळून घेतलं. त्यामुळं तो रोल मला जमला.
मीही खचून गेलो...त्यानेच मला सगळे काही दिले. त्याच्यामुळे मी इथे टिकलो. पण त्याच्या जाण्याचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. त्याच्या मृत्यूनंतर मी जवळपास काम करणे बंदच केले. मी काम घेत नव्हतो. त्याच्या त्या शेवटच्या दिवसांचा मला धक्का बसला होता. त्याने असे जायला नको होते. त्याला त्या अवस्थेत पाहवत नव्हते. खाणे कमी केलेले. पण तो गेला आणि मी पण रंगभूमीपासून बराच दूर गेलो. तो गेला आणि मीही खचून गेलो.