सध्या मराठी इंडस्ट्रीत एकामागोमाग नवनवीन विषयांवरील चित्रपटांची रांग लागली आहे. या रांगेत आता एक नवा सिनेमा आला आहे, ज्याचं नाव आहे 'मन येड्यागत झालं'. या चित्रपटाच्या निमित्ताने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी 'स्वानंदी बेर्डे' हिनं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. यानिमित्ताने ती विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतचे तिनं 'स्टार किड' म्हणून इंडस्ट्रीत काम करताना येणाऱ्या जबाबदारी आणि नेपोटिझमवर भाष्य केलं.
स्वानंदी बेर्डेने नुकतेच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली. यावेळी तिला तुझे वडिल उत्तम अभिनेते होते. आता मोठ्या पडद्यावर पादर्पण करताना मनाशी काय ठरवून आलीस असा प्रश्न विचारला. यावेळी ती म्हणाली, 'खर सांगू तर मी इंडस्ट्रीत येण्याआधी काहीचं ठरवलं नव्हतं.मला खूप दबाव वाटायचा कधी-कधी. पण आता तसे नाही. आता काळानुसार ते कमी होतं गेलं आहे'.
पुढे ती म्हणाली, 'सुरुवातीला मी अभिनेत्री न होण्याचं ठरवलं होतं. कारण, खूप दवाब असतो आणि नेपोटिझमवर खूप भाष्य केलं जातं. इंडस्ट्रीत काम करताना एक अभिनेत्री आणि 'स्टार किड' म्हणून स्व:ताला सिद्ध करावं लागतं. मला तो दबाव नको होता. पण, आता मला वाटतं की ते सर्व करु शकते. माझ्यामध्ये ती गोष्ट आहे. म्हणून मी माझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे'.
याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर एन्ट्री केली होती. 'मन येड्यागत झालं' हा मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा सिनेमा १ मार्चला प्रदर्शित झाला आहे.