मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती (Laxmikant Berde Birth Anniversary) आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे १६ डिसेंबर, २००४ साली एका गंभीर आजाराने निधन झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर त्यांचे पहिले लग्न रुही यांच्यासोबत झाले होते. कालांतराने ते दोघे विभक्त झाले होते. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना डेट करू लागले होते. १९९८ साली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे यांच्यासोबत लग्न केले होते. लक्ष्मीकांत आणि प्रिया यांना दोन मुले आहेत स्वानंदी आणि अभिनय. हे दोघेही सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला रत्नागिरीमध्ये झाला. लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या ५ भावंडांपैकी एक. लक्ष्मीकांत बेर्डे लहानाचे मोठे चाळीतच झाले होते. ते मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहानपणी लॉटरीची तिकिटे सुद्धा विकली होती.
करिअरच्या सुरुवातीला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आणि रंगभूमीवर काम केले. सुरूवातीला सहाय्यक भूमिका केल्या. मराठी साहित्य संघात कर्मचारी म्हणून काम करत असताना लक्ष्मीकांत यांनी मराठी रंगमंचावरील नाटकांमध्ये काम साकारण्यास सुरुवात केली. लक्ष्मीकांत यांनी लेक चालली सासरला या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये टूर टूर या मराठी नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर, ते आणि अभिनेता महेश कोठारे यांनी धूम धडाका (१९८४) आणि दे दना दन (१९८५) या चित्रपटात एकत्र काम केले. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले यात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली विनोदीशैली सर्वांना दाखवून दिली. ज्यामुळे ते एका रात्रीत लोकप्रिय झाले.
१९८९ साली सलमान खानसोबत मैने प्यार किया या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डेंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हम आपके हैं कौन, मेरे सपनो की राणी, आरझू, साजन, बेटा आणि अनारी हे त्यांचे हिंदी चित्रपट गाजले. सर्वांना खळखळून हसविणार्या या विनोदाच्या बादशाहाने १६ डिसेंबर २००४ साली अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानामुळे आजही ते प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहेत.