पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदाचा सम्राट लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) अचानक प्रेक्षकांना रडवून निघून गेला. लक्ष्याचं जाणं सर्वांनाच हादरवणारं होतं.जसा पडद्यावर तसाच खऱ्या आयुष्यातही हसतखळत राहणाऱ्या लक्ष्याने वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला. सिनेमांमध्ये यश मिळायला सुरुवात झाली पण एक असं वादळ आलं ज्यात त्यांचं जहाजच बुडालं. त्यांची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचं ब्रेन ट्युमरच्या आजाराने निधन झालं. तेव्हा लक्ष्या पुरता कोसळला होता.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं पहिलं लग्न अभिनेत्री रुही बेर्डे यांच्याशी झालं होतं. रुही बेर्डे त्याकाळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या.नाटकातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री रुही यांच्यासोबत लग्न केले. दरम्यान रुही बेर्डे यांनी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा चांगला ठसा उमटवला होता. आ गले लग जा हा रुही यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. रुही यांची आराम हराम आहे, डार्लिंग डार्लिंग, दोस्त असावा तर असा, दुनिया करी सलाम, जावई विकत घेणे आहे. मामला पोरींचा हे मराठी चित्रपट, नाटक खूप गाजले.
पहिल्या पत्नीचं निधन आणि 'तो' निर्णय
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या उमेदीच्या काळात पत्नी रुही बेर्डे खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या होत्या. इतकंच काय तर त्यांनी स्वत:चं करिअरही सोडलं. मात्र दीर्घ आजाराने त्यांचं ५ एप्रिल १९९८ रोजी निधन झालं. अंत्यंस्कारावेळी रुहीच्या अंगावरील एकही दागिना काढणार नाही असा निर्णय लक्ष्याने घेतला आणि पत्नीच्या पार्थिवाला अग्नी दिला होता.