माझ्या यशाचे श्रेय या महिलेला, लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी मुलाखत झाली सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 05:41 PM2021-05-27T17:41:15+5:302021-05-27T17:44:06+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे यांना आजही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या जुन्या मुलाखतीदेखील त्यांचे चाहते तितक्याच आवडीने ऐकतात.

laxmikant berde give credit to his success to his mother | माझ्या यशाचे श्रेय या महिलेला, लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी मुलाखत झाली सोशल मीडियावर व्हायरल

माझ्या यशाचे श्रेय या महिलेला, लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी मुलाखत झाली सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देलक्ष्मीकांत आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या हिंदीतील भूमिका देखील प्रचंड गाजल्या. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

लक्ष्मीकांत आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांना आजही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या जुन्या मुलाखतीदेखील त्यांचे चाहते तितक्याच आवडीने ऐकतात. सध्या त्यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या मुलाखतीत ते त्यांच्या यशाचे श्रेय एका महिलेला देत आहेत. ही महिला दुसरी कोणी नसून त्यांची आई आहे.

या मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी आपल्या विनोदाचं श्रेय आपल्या आईला दिलं होतं. त्यांच्या आईचं नाव रजनी असं होतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य गरिबीत गेलं. तरीही त्यांनी अफाट कष्ट करुन आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कधीही आपली स्वप्न पूर्ण करता आली नाही. मात्र याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दिसली नाही. त्या कायम हसतमुख राहायच्या. त्यांचा स्वभाव फार मिष्किल होता. त्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायच्या. आईचा स्वभाव सांगताना त्यांनी त्यांच्या आईसोबत घडलेला एक किस्सा देखील या मुलाखतीत सांगितला. 

लक्ष्मीकांत यांच्या आई आजारी असल्याने लक्ष्मीकांत आणि त्यांचे भाऊ त्यांना रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी डॉक्टरांचा संप असल्याने त्यांच्या आईच्या उपचारात अडथळे येत होते. रजनी असा आवाज पुकारल्यावर लक्ष्मीकांत आणि त्यांचे भाऊ त्यांना उपचारासाठी पुढे घेऊन गेले. तर तिथे गेल्यावर त्यांना कळले की, दुसऱ्याच कोणत्या रजनी या महिलेला डॉक्टर बोलावत आहेत. ती रजनी गरोदर होती. त्यावर या वयात माझी डिलेव्हरी करणार का? असं म्हणत त्यांच्या आई हसू लागल्या होत्या. अत्यंत आजारी असतानाही आसपासचं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा हा खटाटोप हेच लक्ष्मीकांत यांच्या विनोदामागचे खरे प्रेरणास्त्रोत होते. लक्ष्मीकांत यांना मिळालेले यश त्यांची आई पाहू शकली नाही ही खंत त्यांना कायम राहिली असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.

Web Title: laxmikant berde give credit to his success to his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.