Join us

लक्ष्मीकांत बेर्डेंनी केली होती दोन लग्न, पहिली पत्नीदेखील होती प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 07:00 IST

लक्ष्मीकांत बेर्डे यांची दुसरी पत्नी प्रिया बेर्डे यांच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अचून विनोदी टायमिंगने सर्वांना खळखळून हसायला भाग पाडणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आजही ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांनी मराठीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. १६ डिसेंबर, २००४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना या जगाचा निरोप घेऊन जवळजवळ १६ वर्षे झाली आहेत. पण त्यांच्या चित्रपटातील अभिनयाच्या माध्यमातून ते आजही आपल्यातच आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खऱ्या आयुष्यात दोन लग्न केली आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची दुसरी पत्नी प्रिया बेर्डे यांच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी देखील एक अभिनेत्री होत्या. करिअरच्या सुरुवातीला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आणि रंगभूमीवर काम केले. पण त्यांना काही खास यश मिळत नव्हते. पण त्यांनी हिंमत सोडली नाही. ते अनेक चित्रपट साईन करत होते. याच कालावधीत त्यांनी कमाल माझ्या बायकोची हा चित्रपट साईन केला. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रुही काम करत होत्या.

कमाल माझ्या बायकोची चित्रपटाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती. या चित्रपटात अलका कुबल लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पत्नी होत्या. पण ते रुहीच्या प्रेमात पडले. रुहीने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते.

तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते. अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत.

अभिनयने ती सध्या काय करते या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदीने नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे