Join us

लक्ष्मीकांत बेर्डे यांची ऑनस्क्रीन आई होती नगरसेविका,झपाटलेलामधील या अभिनेत्याची होती पत्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 2:32 PM

अलका इनामदार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत निवडणूक लढली होती आणि त्या नगरसेविका देखील बनल्या होत्या.

ठळक मुद्देअलका इनामदार यांच्या पतीचे नाव दिनकर इनामदार असे होते. दिनकर इनामदार यांनी कलावंतीण, इरसाल कार्टी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या हिंदीतील भूमिका देखील प्रचंड गाजल्या. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यांच्या अनेक चित्रपटात आपल्याला त्यांच्या आईच्या भूमिकेत अलका इनामदार यांना पाहायला मिळाले होते. याच अलका इनामदार यांच्याविषयी आम्ही तुम्हाला काहीतरी खास सांगणार आहोत.

अलका इनामदार यांनी हृदयस्पर्श, माहेरची सोडी, मुंबईचा फौजदार, शेम टू शेम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. अभिनयक्षेत्रातून संन्यास घेतल्यानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत निवडणूक लढली होती आणि त्या नगरसेविका देखील बनल्या होत्या. त्यांचे पती देखील अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 

अलका इनामदार यांच्या पतीचे नाव दिनकर इनामदार असे होते. दिनकर इनामदार यांनी कलावंतीण, इरसाल कार्टी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचा त्यांचा एक चित्रपट तर चांगलाच गाजला होता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची मुख्य भूमिका असलेल्या झपाटलेला या चित्रपटाने त्याकाळात बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला व्यवसाय केला होता. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. दिनकर इनामदार यांनी झपाटलेला या चित्रपटात धनाजीराव ही भूमिका साकारली होती. लक्ष्मीकांत या चित्रपटात बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. याच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून धनाजीराव यांची टिंगल करत लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.

अलका यांच्या निधनानंतर एकाच वर्षांत दिनकर यांचे देखील निधन झाले. ते दोघे कोल्हापूरमध्येच राहात होते. जयप्रभा स्टुडिओपासून अगदी जवळ त्यांचे घर होते.  

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे