आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे मराठी सिनेसृष्टी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). उत्तम अभिनयकौशल्य, विनोदाचं परफेक्ट टायमिंग यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे अल्पावधीत लोकप्रिय झाले. आजवरच्या कारकिर्दीत लक्ष्मीकांत यांचे असंख्य चित्रपट गाजले. विशेष म्हणजे आज ते हयात असते तर आजही त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असता. लक्ष्मीकांत यांचं निधन होऊन आज कित्येक वर्ष लोटली. मात्र, त्यांच्याविषयीचे अनेक किस्से प्रेक्षकांमध्ये चर्चिले जातात. यामध्येच सध्या त्यांच्या धडाकेबाज या सिनेमाच्या सेटवरील एक किस्सा चर्चिला जात आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनयाला त्यांचं आयुष्य जणू काही वाहून दिलं होतं. त्यामुळे प्रत्येक भूमिका साकारताना ते प्राण ओतून काम करायचे. असाच किस्सा त्यांचा धडाकेबाज सिनेमाच्या सेटवर घडला. एका सीनमध्ये त्यांच्या हाताला बंदुकीची गोळी लागून हात रक्तबंबाळ झाला होता. मात्र, तरीदेखील त्यांनी सीन पूर्ण होईपर्यंत हा त्रास सहन केला. एका मुलाखतीत महेश कोठारे यांनी या सीनविषयी उल्लेख केला.
'धडाकेबाज' या चित्रपटातील गाणं शूट करत असताना गाणं संपत आणि दरोडेखोर येतात त्यांना मारण्यासाठी लक्ष्या गंगारामला बोलवतो आणि गंगाराम सगळ्यांना बंदुका देतो पण लक्ष्याला मात्र सांगितलं जात कि तू फक्त बोट पुढे कर गोळी निघेल. परंतु, हा सीन करण्यामागे महेश कोठारे यांनी एक शक्कल लढवली असते. त्यानुसार, लक्ष्मीकांत यांच्या कॉस्चुममधून एक नळी टाकून अॅक्शन म्हटल्यावर बोटांजवळून गोळी फायर होणार होती आणि झालं ही तसंच, सीन ओके झाला. विशेष म्हणजे हा सीन परफेक्ट झाल्यामुळे महेश यांनी ओके म्हणून सीन कट केला. परंतु, त्याचवेळी लक्ष्मीकांत यांचा हात रक्तबंबाळ झाला होता. सीन शूट करताना कॉस्चुममध्ये घातलेल्या नळीतून गोळी सुटली, गोळीचा स्फोटही झाला. मात्र, ही गोळी लक्ष्मीकांत यांच्या हातातच फुटली होती.
दरम्यान, लक्ष्मीकांत यांच्या हाताला झालेली दुखापत पाहून महेश यांनी ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचारही झाले. विशेष म्हणजे हाताला एवढी दुखापत झालेली असतानाही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी उद्याच्या शूटचं काय करायचं? असा प्रश्न महेश यांना विचारला होता. ज्यामुळे ते प्रचंड भारावून गेले होते.