Join us  

'ही गाडी तोडून टाका'; चाहत्यांच्या कृतीमुळे वैतागले होते लक्ष्मीकांत बेर्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 3:50 PM

Laxmikant berde: लक्ष्मीकांत यांची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. एकदा तर असा प्रसंग घडला होता की, लक्ष्मीकांत यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती.

आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). दर्जेदार अभिनयशैली, विनोदाचं उत्तम टायमिंग साधणाऱ्या या कलाकाराचं निधन होऊन बरीच वर्ष झाली. मात्र, आजही त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या स्मरणात आहेत. म्हणूनच, वरचेवर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. यात सध्या लक्ष्मीकांत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये घडलेल्या एका घटनेची चर्चा होत आहे.

लक्ष्मीकांत यांची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे लक्ष्मीकांत कुठेही दिसले की चाहते त्यांच्याभोवती घोळका करत होते. एकदा तर असा प्रसंग घडला होता की, लक्ष्मीकांत यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली. परिणामी, लक्ष्मीकांत यांनी चाहत्यांना गाडी तोडून टाका, असं म्हटलं. 

नेमकं काय घडलं होतं?

१९९२ साली लक्ष्मीकांत यांचा एक होता विदूषक हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच लक्ष्मीकांत यांचं वेगळं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. या चित्रपटातून जणू त्यांनी त्यांचा खरा प्रवास पडद्यावर मांडला होता. हा चित्रपट त्याकाळी तुफान सुपरहिट झाला होता. त्यामुळे लक्ष्मीकांत यांना पाहण्यासाठी चाहत्यांना तोबा गर्दी केली. विशेष म्हणजे हा जमाव इतका मोठा होता की लक्ष्मीकांत यांना गाडीतून बाहेर पडणंही अशक्य झालं होतं.

लक्ष्मीकांत यांची एक भेट व्हावी यासाठी काही चाहते त्यांच्या गाडीवर चढले होते. या गर्दीतून लक्ष्मीकां कसेबसे बाहेर पडले आणि त्यांनी चाहत्यांना विनंती केली की, 'तुम्ही माझी गाडी तोडून टाका. त्याला काहीही करा',असं त्यांना थेट सांगितलं.

"तुम्हाला या गाडीचं काय करायचंय ते करा. कारण, ही गाडी मी तुमच्याच पैशातून घेतली आहे. तुम्ही थिएटरमध्ये आलात आमचा चित्रपट बघितलात. आणि त्या पैशातूनच मी गाडी घेतली आहे. त्यामुळे माझा तिच्यावर हक्क नाही. पण तुमचा माझ्यावर हक्क आहे," असं लक्ष्मीकांत म्हणाले.

दरम्यान, लक्ष्मीकांत यांच्यातील नम्रपणा पाहून चाहते वरमले आणि त्यांनी लक्ष्मीकांत यांना जाण्यासाठी वाट मोकळी करुन दिली. परंतु, हा किस्सा आजही अनेक चाहत्यांच्या स्मरणात आहे. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेसिनेमासेलिब्रिटी