नव्वदच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde ) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) या मराठी चित्रपटसृष्टीतील जोडीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या जोडीने एकत्र केलेले चित्रपट सुपरडुपर हिट ठरले आहेत. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावायची. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर ही कमी प्रकर्षाने जाणवू लागली होती. अनेकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा त्यांच्या बालपणीचा आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. पाच भावंडं आई वडील असे त्यांचे कुटुंब, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पण त्यांच्या आईचा स्वभाव अतिशय विनोदी असल्यामुळे घरच्या हलाखीच्या परिस्थितीची झळ त्यांना मुळीच जाणवली नाही. बिकट परिस्थितीला हसत सामोरे कसं जायचं हे लक्ष्मीकांत बेर्डे आईकडूनच शिकले होते. लहानपणी लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाटायचे की आपण मोठे होऊन बस कंडक्टर बनायचे, जमा झालेले तिकिटाचे पैसे घेऊन श्रीमंत व्हायचे. पण नंतर कळालं की ते तिकिटाचे गोळा झालेले पैसे कार्यालयात जमा करायला लागतात. त्यावेळी बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांच्या स्टाईलला अनेकजण कॉपी करायचे. यावरून लक्ष्मीकांत बेर्डे यांना मार खावा लागला होता. हा किस्सा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.
खावा लागला वडिलांचा मार
जितेंद्र आपल्या चित्रपटातून नेहमी टाईट पॅन्ट घालायचा. ती स्टाईल लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा कॉपी केली होती. जितेंद्र घालतो तशीच पॅन्ट लक्ष्मीकांत बेर्डे यांनी घेतली होती. ती पॅन्ट घातल्यानंतर मात्र बसताही येत नव्हते आणि उठताही येत नव्हते अशी गत झाली होती. अशातच ती पॅन्ट फाटली म्हणून त्यांना वडिलांचा मार खावा लागला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. मैने प्यार किया हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. सलमान खान, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, जितेंद्र यांच्यासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा जितेंद्र यांच्यासोबत काम करत असताना ‘तुमच्यामुळे मी लहानपणी मार खाल्ला होता’ असा किस्सा त्यांनी ऐकवला होता.