लक्ष्मीकांतच्या सहकलाकरांनी जागवल्या त्याच्या आठवणी... ते सांगत आहेत, आज लक्ष्मीकांत असता तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2016 2:48 PM
मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि मी जिंकून घेतलं सारं’ ‘हमाल दे धमाल’ या मराठी सिनेमातल्या याच गाण्याच्या ...
मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि मी जिंकून घेतलं सारं’ ‘हमाल दे धमाल’ या मराठी सिनेमातल्या याच गाण्याच्या ओळीप्रमाणे त्याने ‘लेक चालली सासरला’ या सिनेमातून रुपेरी दुनियेत पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर त्याने आपली ओळख निर्माण केली. लक्ष्मीकांतचा वाढदिवस 26 आॅक्टोबर पण तिथीनुसार तो लक्ष्मीपूजनला साजरा केला जात असे. आज लक्ष्मीकांत असता तर दरवर्षीप्रमाणे यंदादेखील त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. आज तो नसला तरी त्याच्या अभिनयातून तो आपल्या सगळ्यांच्या सोबतच आहे. त्याच्या काही आठवणी त्याच्या सहकलाकारांनी सीएनएक्ससोबत शेअर केल्या.प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत हा बदललेल्या काळाला स्वीकारणारा होता. आज कॉमेडीची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. त्याची कॉमेडीची स्टाइलच खूप वेगळी होती. पण त्याने आताच्या स्टाइलनुसार स्वत:ला बदलले असते याची मला खात्री आहे. अनेकवेळा दिग्गज कलाकारांना मी पणा सोडवत नाही. आपण जे म्हणतो, जे करतोय तेच योग्य असल्याचे त्यांना वाटते. पण असा अट्टाहास करणारा लक्ष्मीकांत कधीच नव्हता. पूर्वी कॉमेडी ही प्रासंगिक होती. अशोक मामा (अशोक सराफ) आणि लक्ष्मीकांत यांची जी कॉमेडीची टायमिंग होती, ती अफलातून होती. आज वेशभूषा करून कॉमेडी केली जाते. पण लक्ष्मीकांत यांना कधी याची गरजच पडली नाही. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच कमरेखालचे विनोद सादर केले नाहीत. माझे प्रेक्षक हे बायका, लहान मुले सगळेच आहेत याची त्यांना चांगलीच जाणीव होती. खरे तर कोणाला हसवणे हे सोपे नाही. पण लक्ष्मीकांत यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय सोपी होती. आज त्यांच्या नसण्याने मराठी नाटक, चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमचा मुलगा अभिनय अनेक एकांकिका जिंकत आहे. तो स्वत:च्या अभिनयाच्या ताकदीवर या क्षेत्रात येणार आहे. आज लक्ष्मीकांत असते तर त्यांना नक्कीच आपल्या मुलाचा अभिमान वाटला असता.निशिगंधा वाड आज लक्ष्मीकांत असता तर अभिनय या गुणी अभिनेत्याला आणि त्याच्या मुलाला त्यानेच लाँच केले असते. प्रियाकडून मी नेहमीच अभिनयने मिळवलेल्या पारितोषिकांविषयी ऐकत असते. मला त्याचे प्रचंड कौतुक वाटते. अभिनयच त्याच्या रक्तात आहे. आज लक्ष्मीकांतनंतर प्रियाने मुलांना अतिशय चांगल्याप्रकारे सांभाळले, यासाठी तिचे जितके कौतुक करू, तितके कमी आहे. मी माझ्या कारर्किदीतील पहिला चित्रपट लक्ष्मीकांतसोबत केला. त्या चित्रपटात सचिन दादा (सचिन पिळगांवकर), अशोक मामा (अशोक सराफ) माझ्यासोबत होते. पण हा माझा पहिला चित्रपट असल्याचे या दिग्गजांनी मला कधी जाणवू दिले नाही. त्यानंतरही मी लक्ष्मीकांतसोबत इतके चित्रपट केले की त्याच्या घरासोबत माझा चांगलाच घरोबा झाला होता. प्रियाला चिडवण्यापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत ते अभिनय आणि स्वानंदीच्या जन्मापर्यंत अनेक आठवणी आहेत. आज लक्ष्मीकांत असता तो दिग्दर्शकाच्या खुर्चीवर नक्कीच बसला असता. त्याला असलेल्या इतक्या वर्षांच्या अभिनयाच्या अनुभवामुळे तो दिग्दर्शक झाला असता. पण त्याला दिग्दर्शक बनायचे होते की नाही हे केवळ प्रियाच आपल्याला सांगू शकते. तू सुखकर्ता या चित्रपटाच्या वेळीचा एक गंमतीदार किस्सा आहे. त्या चित्रपटात एक अंताक्षरी होती. त्या गाण्याचे कोरिओग्राफर सुबल सरकार होते. त्या गाण्यादरम्यान लक्ष्मीकांत नाचता नाचता गिरक्या घेत होता. त्यावर अशोक मामाने विचारले हे कोरिओग्राफीत नसताना तू काय करत आहेस. त्यावर मी शब्द विसरलो की, गिरक्या घेतो असे तो सांगताच आमच्या सगळ््यांसोबत सुबल सरकारदेखील हसले होते. आदिनाथ कोठारे मी त्यांच्यासोबत छकुला या चित्रपटात काम केले. पण त्यापेक्षाही ते माझे खूप जवळचे, लाडके काका होते. त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी आहेत. छकुला या चित्रपटाच्यावेळी मी चौथीत होतो. पॅकअप करून आम्ही कोल्हापूरवरून निघालो, त्यावेळी मला घट्ट मिठी मारून मला याच्यासोबत आणखी एक चित्रपट करायचा आहे असे ते म्हटले होते. झपाटलेला 2 या चित्रपटात मी लक्ष्मीकांत बोलकेच्या मुलाची भूमिका साकारली होती, हा चित्रपट आम्ही त्यांना समर्पित केला होता, तो क्षण माझ्यासाठी प्रचंड इमोशनल होता. त्यांचा वाढदिवस लक्ष्मीपूजनला असायचा, तो दिवस आम्हा सगळ््या लहान मुलांसाठी खूप स्पेशल असायचा. कारण त्यांच्या वाढदिवसाला ते खूप सारे फटाके आणायचे आणि आम्ही सगळे मिळून ते वाजवायचो. ते गेले त्यावेळी मी 11-12वीत असेन. माझ्यासोबत मस्ती करणारा, मला खूप काही शिकवणारा माझा लाडका काका आमच्यातून गेला होता. आज माझा लाडका काका असता तर आजही आमचे नाते तसेच राहिले असते. अलका कुबल लक्ष्याविषयी जेवढे बोलू तेवढे कमीच आहे. लक्ष्याच्या असंख्य आठवणी आजही आमच्या मनात घर करून आहेत. असे वाटतच नाही की लक्ष्या आमच्यात नाहीय. त्याच्या प्रत्येक गोष्टी तो असल्याचा भासवतात. आजही त्याचा सिनेमा टीव्हीवर पाहतो तेव्हा तो आपल्यात नाही असे क्षणासाठीही वाटत नाही. जेव्हा त्याच्या मुलांना पाहतो तेव्हा लक्ष्या आमच्यातच असल्याचे वाटते. 'स्टारडम' म्हणजे काय असते हे खरे लक्ष्याला बघितल्यावरच कळते. आजही लक्ष्मीकांत बेर्डे नाव घेताच रसिकांनाही लक्ष्याचे सिनेमे डोळ्यांसमोर दिसू लागतात. आज मीडिया, अनेक चॅनल्समुळे प्रसिद्धी पटकन मिळते. आमच्या वेळी असे काहीही नव्हते तरीही त्या वेळच्या कलाकारांविषयीची क्रेझ आजही कायम आहे. लक्ष्याविषयीची एक आठवण शेअर करायला आवडेल. मला चांगले आठवतेय काही वर्षांपूर्वी दंगली झाल्या होत्या. नेमके वर्ष आठवत नाहीय. त्या वेळी सर्वत्रच चिंतेचे वातावरण पसरले होते. अचानक रस्त्यात माझी गाडी खराब झाली. ती साईडला पार्क करून मी घरी आले. माझी रस्त्यात पार्क केलेली गाडी लक्ष्याने पाहिली. आणि त्याने लगेच घरी लँडलाईनवर फोन केला. आपुलकीने माझी विचारपूस केली. अलका कशी आहे? सुरक्षित घरी पोहोचली की नाही? असे अनेक प्रश्न त्याने काळजीपूर्वक विचारले. माझ्या दोन्ही मुली लहान होत्या. त्यांना घेऊन मी सेटवर शूटिंगला जायचे. त्या वेळी त्याची मला मदत व्हायची. लक्ष्याने कधीही कमरेखालचे विनोद केले नाहीत. कॉमेडीच्या माध्यमातून त्याने कोणाला दुखवले नाही. अशी निखळ कॉमेडी त्याची असायची. म्हणूनच तर आजही कॉमेडीचा बादशाह म्हटले की फक्त लक्ष्याचेच नाव घेतले जाते. कॉमेडीचे अचूक टाईमिंग काय असते हे लक्ष्याकडून शिकण्यासारखे होते. जितका ग्रेट तो कलाकार होता तितकाच ग्रेट माणूसही होता. सगळ्यांचाच तो चांगला मित्र होता. त्याचा अभिनय, त्याची ड्रेसिंग स्टाइल सारे काही अगदी भारीच असायचे. असा हा अवलिया पुन्हा होणे नाही.