Join us

फाळके पुरस्कार विजेता कलाकार जगतायेत हलाखीचं जीणं, कलाकारांकडे मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 6:36 PM

लीलाधर सावंत यांनी कलादिग्दर्शक म्हणून तब्बल 177सिनेमांसाठी काम करत आपले एक वेगळे स्था निर्माण केले होते. 25 वर्षांपासून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे.

स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही.

 

अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी आणि सरकारनंही दुर्लक्ष केलं. यांत आणखी एका नावाची भर पडली आहे ज्येष्ठ कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांची.लीलाधर सावंत यांनी कलादिग्दर्शक म्हणून तब्बल 177सिनेमांसाठी काम करत आपले एक वेगळे स्था निर्माण केले होते.

'सागर', 'हत्या', '110 डेज', 'दीवाना', 'हद कर दी आपने' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांचा समावेश आहे. हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 25 वर्षांपासून अधिक काळ  त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. मात्र आता  नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणलीय. चित्रपटसृष्टीत इतकं योगदान देऊनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्यावर हलाखीचं जीणंच वाट्याला आले आहे.

उतारवायत त्यांच्याकडची सर्व जमापुंजी संपली आहे. सावंत यांना दोन वेळा ब्रेन हॅमरेज झालं असून, त्यांच्यावर दोन वेळा बायपास शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी, औषधपाण्यासाठी तसंच उदरनिर्वाहासाठीदेखील त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिलेले नाहीत.

 

अशा या हलाखीच्या परिस्थितीत पत्नी पुष्पा सावंतयांनीच चित्रपटसृष्टीला, कलाकारांना मदतीचं आवाहन केलं आहे. तसंच कलाकारांवर अशी वेळ येऊच नये यासाठी चित्रपटसृष्टीने पुढाकार घेऊन काही ना काही ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे.तसंच मायबाप सरकार, विशेषतः सांस्कृतिक मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.