Gargi Phule: कृष्णाजी निळकंठ फुले म्हणजे जेष्ठ अभिनेते यांचं नाव मराठी सिनेसृष्टीत मोठ्या आदराने घेतलं जातं. 'राजकारण गेलं चुलीत', 'कथा अकलेच्या कांद्याची', 'सूर्यास्त' ही लोकप्रिय नाटकं तसेच 'एक गाव बारा भानगडी', 'थापाड्या', 'चोरीचा मामला', 'शापित', 'सामना', 'सिंहासन', 'पिंजरा' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले (Gargi Phule) यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करुन त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. आता कलाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेत निळू फुलेंच्या लेकीनं नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. याचदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गार्गी यांनी अनेक खुलासे केले.
गार्गी फुले-थत्ते यांनी अलिकडेच 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान संवाद साधताना त्यांना स्टार किड असण्याचं दडपण असतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गार्गी फुले म्हणाल्या, "हो, स्टार किड असण्याचं दडपण कायम असतं. आपल्याकडून काही वेगळं घडू नये किंवा कुठेही निळू फुले या नावाला धक्का लागू नये, याचा सतत प्रयत्न चालू असतो. ती इमेज खूप सांभाळावी लागते. मी खूप प्रयत्न करते की त्यांच्या नावाला कुठेही माझ्याकडून धक्का लागू नये."
पुढे गार्गी फुले म्हणाल्या, "मला नेहमी वाटतं की, आपण माणूसकी जपली पाहिजे. स्टारडम, पैसा किंवा लोकप्रियता ही येत असते. जे आता आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे लोकांपासून आपण खूप दूर जात आहोत. हे मला बाबांनी सांगितलं होतं. कोरोनामध्ये ते जाणवलंच. पण, माणसाला माणूस भेटला पाहिजे. त्याच्यामधील माणूसकी जपता आली आहे." असं त्यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, गार्गी फुले यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत काम करतामा दिसल्या. त्याचबरोबर 'राजा राणीची गं जोडी', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'शुभविवाह' 'इंद्रायणी' या मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत.