महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये आज रंगला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध श्रेणीतील मान्यवरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखलाही त्याच्या 'वेड' सिनेमासाठी गौरविण्यात आलं आहे. रितेशने हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर, मला लाईफटाईम अचिव्हमेंट मिळाल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्याने लोकमतचे ही आभार मानले.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. या चित्रपटातील गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आणि पाठोपाठ चित्रपटही डोक्यावर घेतला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नुसता धुमाकूळ घातला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला.
दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. ५० दिवसांत 'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला होता तर देशात ६०. ६७ कोटींचा बिझनेस केला होता. आता १०० दिवसांत या चित्रपटाने एकूण किती कमाई केली तर १०० दिवसांत 'वेड'ने एकूण ७५ कोटींची कमाई केली आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरला आहे. थिएटरनंतर आता प्रेक्षकांना पुन्हा रितेश-जिनिलियाची केमिस्ट्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.