जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तसेच देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत कित्येक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्व कामकाज बंद असल्यामुळे काहींवर उपासमारीची वेळ आली आहे.
अशात काही कलाकारांनी मुंबईतून आपल्या घरी परतले आहेत. अशातच मराठी अभिनेता तुषार शिंगाडेवर देखील लॉकडाउनमुळे हातात काम नसल्यामुळे गावी परतावे लागले. सध्या तो गावामध्ये न्हाव्याचे काम करतो आहे.
अभिनेता तुषार शिंगाडेने चित्रपट, मालिका व नाटकात छोट्या मोठ्या भूमिका केली आहे. त्याची युट्यूबवर नुस्ता फिल्मी या चॅनेलवर ब्रो नामक वेबसीरिज सुरू होती. पण या लॉकडाऊनच्या काळात गेले ३ महीने हातात काही काम नसल्याने त्याने मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील घर सोडून ५ जूनला १७,०००/- भरून प्रायव्हेट कारने तो त्याच्या कोकणातील गावी मालवणमधील ओवळीये येथे आला. गावी आई बाबा दोघेच राहत असल्याने, त्यांना शेतीत मदत करतो आहे आणि वेळ मिळल तेव्हा त्याच्याकडील ट्रीमरने गावातल्या लोकांचे केसही कापतो आहे. केस आणि दाढी कापायचे ५० रू. प्रमाणे त्याने आता पर्यंत १०००/- रू. कमावले आहेत, असे त्याने सांगितले.
कोरोनाचे संकट टळल्यावर मुंबईत येऊन पुन्हा अभिनयाच्या कामाला सुरूवात करणार असल्याचे तो सांगतो.