सध्या देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्षांकडून यासाठी प्रचाराची तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत काही राजकीय पक्षांनी थेट सेलिब्रिटींनाच रिंगणात उतरवलं आहे. तर अनेक कलाकारांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. भाजपाकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल, हेमा मालिनी यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. तर शिंदे गटाच्या तिकिटावर मुंबईत गोविंदा निवडणुक लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये मराठी कलाकारांचीही नाव पुढे येत होती.
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडण्यासाठी शिंदे गटाकडून काही मराठी अभिनेत्यांच्या नावाबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यामध्ये शरद पोंक्षे, सचिन खेडेकर आणि सचिन पिळगावकर या तीन नावांच्या चर्चा सुरू होत्या. यावर आता सचिन पिळगावकर यांनी फेसबुक पोस्टमधून भाष्य केलं आहे. "मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली...मी हसलो, एवढंच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा....६१ वर्ष आपला, सचिन पिळगांवकर", असं म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सचिन पिळगावकर यांच्या पोस्टमुळे ते निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पण, अद्याप शरद पोंक्षे किंवा सचिन खेडेकर यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राजकारणात एन्ट्री घेणार का? आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.