अभिनेता केके मेननचं मराठीतलं पदार्पण, अभिनेता लोकेश विजय गुप्तेचं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून 'एक सांगायचंय.......Unsaid Harmony हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.देवी सातेरीप्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि अन्य मान्यवरमंडळी आवर्जून उपस्थितहोती.या चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे.
नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. लोकेश विजय गुप्तेंन या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन आणि राजेश्वरीसचदेव यांच्यासह चित्रपटात पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी आदींच्या मुख्यभूमिका आहेत. चित्रपटाचं गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वेनं केलं आहे. ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे, तर पुष्पांकगावडेनं सिनेमॅटोग्राफी केली असून चैत्राली लोकेश गुप्तेने वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे.अवधूत गुप्ते, बेला शेंडे, तुषार जोशी, विवेक नाईक, आरती केळकर, राशी हरमळकर यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.
सिनेमाची कथा मला जेव्हा ऐकवली तेव्हाच ती मला आवडली आणि अवघ्या वीस मिनिटात मी होकार दिला.महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेलीसमजते. या सिनेमासाठी मी खास मराठी शिकलो आणि त्यासाठी मला लोकेशची फार मदत झाली असे अभिनेता के.के.मेनन यांनी सांगितले.
सिनेमा दिग्दर्शित करण्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे. मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुलं या दोघांवरही होणारे बरे-वाईट परिणाम या सिनेमातूनमांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देईल, असं लोकेशनं सांगितलं.
केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्या तगड्या अभिनयाची जुगलबंदी असलेला हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.