उभ्या महाराष्ट्राला 'वेड' करुन सोडणारा अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे रितेश देशमुख. मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या रितेश देशमुख याने काही काळापूर्वीच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वेड या सिनेमाच्या माध्यमातून त्याने त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याच्या या डेब्यू फिल्मसाठी त्याला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' (Lokmat Maharashtrian Of The Year) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्याने पुरस्कार स्वीकारताना माझ्याकडे काम नाही असं म्हटलं. त्याच्या या वाक्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
पहिल्या सुपरहिट ठरलेल्या 'वेड' या डेब्यू फिल्मसाठी रितेशला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्याची छोटेखानी मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये वेडपूर्वीचा रितेश आणि वेड रिलीज झाल्यानंतरचा रितेश या दोघांमध्ये काय फरक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रितेशने भन्नाट उत्तर दिलं.
"फारसं काही बदललं नाही. फक्त फरक एवढाच आहे की आधी मी अभिनेता म्हणून ओळखला जात होतो. आणि, आता अभिनेता-दिग्दर्शक म्हणून ओळखला जातोय हाच काय तो फरक आहे. तेव्हाही काम नव्हतं, आणि आजही काम नाहीये", असं रितेश म्हणाला.
दरम्यान, रितेशने मजेशीर अंदाज हे उत्तर दिलं. मात्र, त्याच्या वेड या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला खरोखर वेड लावलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर या सिनेमाच्या माध्यमातून रितेशची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.