बिग बॉस मराठी या लोकप्रिय पण तितक्याच वादग्रस्त कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) जेतेपद पटकावल्यानंतर बिग बॉस १६ (bigg boss 16), खतरों के खिलाडी अशा कितीतरी रिअॅलिटी शोमधून त्याने स्वत: मधील खिलाडूवृत्ती दाखवून दिली. त्यामुळे आज शिव ठाकरे हे नाव मराठीसह हिंदी कलाविश्वालाही नवीन नाही. विशेष म्हणजे एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला शिव आज त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. त्याची ही स्टाइल लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यामध्येही पाहायला मिळाली.
नुकताच 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात शिव ठाकरेने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे दरवेळी प्रमाणे त्याच्या स्वच्छंदी स्वभावाने त्याने चाहत्यांना आपलंसं केलं. शिवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा हटके अंदाज दिसून येतो.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात शिवने स्पेशल डिझाइन केलेला आऊटफिट परिधान केला होता. त्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट आणि लाइकचा पाऊस पाडला आहे. शिवने २०१७ मध्ये एमटीव्ही रोडीज रायझिंग या रिअॅलिटी शोमधून त्याच्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये तो उपांत्य फेरीपर्यंत गेला. मात्र, त्यानंतर तो बाद झाला. परंतु, त्याने प्रयत्न सोडले नाहीत. पुन्हा प्रयत्न केले आणि रोडीजमध्ये बाजी मारली. रोडीज संपल्यानंतर २ वर्षाने तो बिग बॉस मराठीमध्ये झळकला. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्याला बिग बॉस हिंदीमध्येही जाण्याची संधी मिळाली. परंतु, हिंदी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी त्याला ६वर्ष वाट पाहावी लागली. बिग बॉस ११ पासून तो ऑडिशन देत होता. परंतु, बिग बॉस १६ मध्ये त्याला प्रवेश मिळाला.