Join us

दगडी चाळ-२: थरार अन् संघर्षाची पुढची गोष्ट!

By देवेश फडके | Published: August 19, 2022 11:57 AM

पहिला भाग सुपरहीट ठरल्यानंतर आता दगडी चाळ सिनेमाच्या सिक्वलची अधिक आतुरतेने प्रेक्षक वाट पाहात आहेत. दगडी चाळ २ च्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्याशी केलेल्या दिलखुलास गप्पा...

- देवेश फडके

पहिला भाग सुपरहीट ठरल्यानंतर आता दगडी चाळ सिनेमाच्या सिक्वलची अधिक आतुरतेने प्रेक्षक वाट पाहात आहेत. दगडी चाळ २ च्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्याशी केलेल्या दिलखुलास गप्पा...

'दगडी चाळ २' मध्ये डॅडी आणि सूर्यामधील संघर्ष आणखी वाढताना दिसणार का?

अंकुश चौधरी: दगडी चाळ सिनेमाचा पहिला भागाची गोष्टी ही आता पाच ते सहा वर्ष पुढे गेली आहे. सूर्या आणि कलरफुल यांच्या आयुष्यात आता बटरफ्लाय म्हणजेच त्यांचा लहान मुलगाही आला आहे. सूर्या आणि कलरफूल यांच्या चांगल्या आणि आनंदी आयुष्यात नंतर काय राडा होतो, सूर्या डॅडी आणि दगडी चाळ विरोधात का जातो, अशी ही 'दगडी चाळ २' ची गोष्ट आहे.

सूर्या आणि कलरफूलमधील केमिस्ट्री 'दगडी चाळ २' मध्ये आणखी रंगीत झालीय का?

पूजा सावंत: जसं अंकुश चौधरी म्हणाले तसं दगडी चाळची गोष्ट पुढे गेलीय. सूर्या आणि कलरफूलचं लग्न झालं आहे. त्यांच्या आयुष्यात आता बटरफ्लाय आहे. त्यात आणखी कलर्स अ‍ॅड झालेले आहेत. सत्या आणि कलरफुल आता नवीन शहरात गेलेत. पहिल्या भागात मुंबई जास्त दिसली होती. आता आणखी अनेक ठिकाणं दिसू शकतील.

दगडी चाळीचा सिक्वेल करताना सूर्या साकारणं किती आव्हानात्मक होते?

अंकुश चौधरी: दगडी चाळ सिनेमाचा पहिला भाग असो वा आताचा 'दगडी चाळ' सिनेमाचा सिक्वेल असो. दोन्ही भागातील सूर्या साकारण्यासाठी मेहनत घ्यावीच लागली. 'दगडी चाळ २' चा ट्रेलर आऊट होईपर्यंत आम्ही कधीच डॅडींना प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. त्यांच्याविषयीच्या गोष्टी ऐकून, पेपरातील कात्रणे, काही व्हिडिओ पाहूनच त्यांच्याबद्दलची माहिती होती. मकरंद देशपांडे सर आणि आम्हाला प्रेक्षकांसमोर ती व्यक्तिरेखा उभी करणं जास्त आव्हानात्मक होतं.

तुमच्याकडे येणाऱ्या भूमिकांची निवड कशी करता? तुमचा निकष काय असतो?

पूजा सावंत: 'दगडी चाळ' आणि 'दगडी चाळ २' या दोन्ही सिनेमांसाठी माझी निवड झाली, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. थोडा वेगळ्या धाटणीचा, थरार, संघर्ष असलेला सिनेमा आहे. एखादी भूमिका माझ्याकडे आली की, त्यासाठी मी फिट आहे का, हे मी प्रथम चाचपडून पाहते. ओढूनताणून एखाद्या रोलची निवड करत नाही. मनाची खात्री झाली की, हा रोल माझ्यासाठी आहे किंवा या रोलसाठी मी योग्य आहे, त्यानंतर सर्व गोष्टी सिनेमाच्या डायरेक्टरवर सोडून देते. बॉलिवूडमध्ये काम केले असले तरी माझा प्रेफरन्स कायम मराठी सिनेमांकडे अधिक राहिला आहे. 

'दगडी चाळ' सिनेमा नेमका कुणाला फोकस करतो? डॅडी की सूर्या?

अंकुश चौधरी: दगडी चाळीला... हा सिनेमा ना डॅडींवर फोकस करतो, ना सूर्यावर. हा सिनेमा दगडी चाळीतल्या गोष्टीवर फोकस करतो. मराठी सिनेमा गोष्ट किंवा त्यातील कंटेटवर अधिक चालतो. अगदी अशोक सराफ, दादा कोडंके, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर अधिकाधिक मराठी सिनेमे केवळ स्टोरीवरच जास्त चालल्याचे पाहायला मिळालं. बॉलिवूडमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमा हिरो किंवा हिरोईनपेक्षा सिनेमाच्या कथेमुळेच लोकांना जास्त आवडला. त्यामुळे स्टोरीवर मराठी सिनेमाचा अधिक भर दिसतो.

ओटीटी प्लॅटफॉर्मचं वाढतं प्रस्थ मराठी सिनेमांसाठी फायद्याचं की तोट्याचं?

अंकुश चौधरी: मला फायद्याचं वाटतं. आपण जसं वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून केवळ हिंदी नाही, तर परदेशातीलही सिनेमे घरबसल्या पाहू शकतो. तसंच आपला मराठी सिनेमा जगातील कुठल्याही कोपऱ्यात बसून ओटीटीवरून पाहता येऊ शकतो. मराठी सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत त्यामुळे पोहोचू शकेल. याशिवाय हातावर पोट असलेला कामगार वर्ग, पोलीस, रिक्षावाले यांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहता आला नाही, तरी सिनेमा ओटीटीवर आल्यामुळे तो त्यांना सवडीने पाहता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल.

 

टॅग्स :सेलिब्रिटीअंकुश चौधरीपूजा सावंतसिनेमा