Join us

लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे ‘लोकशाही’, सिनेमाचे शीर्षक पोस्टर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 6:00 PM

अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.

शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.’ याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच सर्व सोशल मीडियावर प्रदर्शित होऊन महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने पसरत आहे.

सुशीलकुमार अग्रवाल निर्मित आणि संजय अमर दिग्दर्शित ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. पोस्टरमध्ये उंच इमारती आणि त्यांना लागूनच असणारे झोपडपट्टी दिसत आहेत. पांढरपेशी भांडवलदारांनी तयार केलेलं स्वत:चं अलिशान  शिखर आणि भांडवलदारांच्या भागीदारीत तेवढ्याच हिस्याचे पात्र असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित लोकांचे कदाचित ते प्रतीक असल्याचे दिसत आहे. तसेच लालभडक धुकट वातावरण आणि चित्रपटाचे नाव, एकूणच चित्रपट राजकारणाशी संबंधित संघर्षाला चिन्हांकित करत असल्याचे दिसत आहे.

पोस्टरमध्ये एकामागोमाग येणारे शीर्षकाचे शब्द आणि शब्दांना साथ देत गूढ आणि उस्फूर्त करणारं पार्श्वसंगीत चित्रपटाबद्दल कमालीचं आकर्षण निर्माण करत आहे. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या ‘लोकशाही’ चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा हा विलक्षण प्रतिसाद पाहून आम्हालाही चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच आतुरता लागली आहे. लवकरच चित्रपटाचा पूर्ण पोस्टर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचणार आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. 

सिनेमात मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, शंतनु मोघे यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटमोहन आगाशेतेजश्री प्रधान समीर धर्माधिकारीगिरिश ओक