अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) हे नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आहेत. या दोघांचे सिनेमे आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात आणि खळखळून हसतात. 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'धूमधडाका', 'शेजारी शेजारी' हे त्यांचे गाजलेले सिनेमे. या दोघांच्या विनोदाचं टायमिंग विलक्षण होतं. लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीचा विकार होता. त्यामुळे २००४ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीकांत बेर्डेची एक्झिट मनाला चटका लावणारी होती, असे नुकतेच अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत म्हटले.
अशोक सराफ यांनी नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ''लक्ष्मीकांतसोबत मी जवळपास ६० चित्रपटांमध्ये काम केले. माझी जी स्टाईल आहे ती लक्ष्मीकांतने बरोबर आत्मसात केली होती. त्याला माहित होतं की मी कधी कुठला लाफ्टर घेणार त्यामुळे तो तयार असायचा. त्यामुळे आमचे टायमिंग चांगला होता. ''
लक्ष्मीकांत बेर्डेंचे आजारपण (Health Condition) आणि निधनाबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले की, ''तो फारच लवकर गेला. त्याची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. काय असतं जाणं हा धक्का असतोच ना. अपेक्षितच असतं एखादा माणूस जाणे. कारण कधी जाईल हे आपल्याला माहित नसतं. अचानक गेला की वाटतं अरे गेला. पण माहित असेल तर त्याचा इफेक्ट कमी होतो.''
ते पुढे म्हणाले की, ''आम्हाला थोडीशी कल्पना होती. त्याची एकूण अवस्था पाहून त्याची तब्येत ढासळतेय हे पाहून वाटत होते की हा लवकर जाणार आहे. पण तो फारच लवकर गेला. म्हणजे वयाच्या ५२व्या वर्षी तो गेला. तो जर असता तर त्याने अजून काहीतरी चांगलं काम केलं असतं. माझ्यासोबतच नाही तर इतर कुणासोबतही स्वतःचं वेगळं काहीतरी केलं असतं. पण त्याला संधीच मिळाली नाही. कारण त्याला जो आजार झाला होता, त्याच्यामुळे त्याची ताकद कमी झाली होती. त्यामुळे तो काहीही करू शकला नाही. पण आता तो असता तर मजा आली असती. कारण आमचे टायमिंग फार चांगलं जुळत होते. ''