सगळीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. काहींची दिवाळीची तयारी झाली आहे तर काहींची अद्याप बाकी आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळत आहे. बाजारपेठा कंदील आणि लाइटिंगच्या रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. दरम्यान आता अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने प्लास्टिक कंदीलबाबत खंत व्यक्त केली आहे.
प्रिया बापटने इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना प्रश्न विचारत कंदीलबाबतचं तिचं मत सांगितलं आहे. तिने म्हटले की, प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला. आपले पारंपरिक कागदाचे कंदील सहजासहजी मिळतच नाहीत. मोजक्या काही ठिकाणी मिळतात. याशिवाय तिने विचारले की, तुम्हाला कोणता कंदील आवडतो? त्यात तिने पारंपारिक कागदी कंदील आणि कोणताही कंदील असे पर्याय दिला आहे. यासोबत तिने तिचे मत मांडले आहे.
अभिनेत्री प्रिया बापट मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस प्रियाच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झाली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरही व्यक्त होत असते.
वर्कफ्रंट..
प्रिया बापटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती आणि उमेश कामत 'जर तरची गोष्ट' नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहेत. आजच्या काळातील नाती, रिलेशनशिप आणि त्याबद्दल तरुणांना पडणारे प्रश्न यावर नाटक आधारित आहे. पहिल्याच दिवसापासून नाटकाचे प्रयोग अगदी हाऊसफुल सुरु आहेत.