Join us  

'छान दिसणं त्रासदायक ठरू लागलं...'; वर्षा उसगावकर यांनी व्यक्ती केली 'ती' खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:39 PM

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांच्याकडं मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचा आज वाढदिवस आहे. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये पाहायला मिळत आहेत. वर्षा उसगावकर यांच्याकडं मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. त्यांच्या सौंदर्याचे, छान दिसण्याचे नेहमीच कौतुक होताना दिसते. मात्र या छान दिसण्याचा अनेकदा त्रास झाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

एका मुलाखतीत वर्षा उसगावकर म्हणाल्या होत्या की, माझ्या दृष्टीने भूमिकेला खूप महत्त्व असते. भूमिका उत्तम असली, की माध्यमाचा प्रश्नच येत नाही. इतकी वर्षं प्रेक्षकांच्या मनात माझी ग्लॅमरस प्रतिमा होती. त्याला छेद देणारी भूमिका मिळण्याच्या प्रतिक्षेत होते. ती मालिकेच्या निमित्तानं मिळाली. हे सगळे कमबॅक करताना जुळून आले म्हणून मालिका स्वीकारली. दरम्यानच्या काळात सिनेमे केले. पण, ते चालले नाहीत. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे असेल तर छोट्या पडद्याशिवाय पर्याय नाही.

आयुष्यात अनेकदा चढ-उतार येत असतात. अपयशाने आयुष्य थांबत नाही, हे मला इंडस्ट्रीने शिकवले. प्रसिद्धीच्या झोत्यात नसलेल्या कलाकारासाठी चांगला दिग्दर्शक आवश्यक असतो. पूर्वी मला सगळे तुम्ही छान दिसता म्हणायचे, तेव्हा छान वाटायचे; पण नंतर त्रासदायक ठरू लागले. अभिनयाबद्दल कोणी का बोलत नाही, ही माझी भावना झाली आणि तेव्हा अभिनयाचे महत्त्व पटल्याचे वर्षा उसगावकर यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, 'अभिनय म्हणजे समोरचा बोलतो, त्यावरची प्रतिक्रिया असते. चांगला दिग्दर्शक नसेल, तर कलाकारांना विकास स्वत: घडवून आणावा लागतो. अभिनय शिकवून येत नाही.केवळ अॅक्शन म्हणून दिग्दर्शक होता येत नाही. लेखक लिहितो ते सहज आणि चांगल्या पद्धतीने पोहचवण्याची जबाबदारी कलाकारांची असते. अभिनय सहज वाटला पाहिजे.

टॅग्स :वर्षा उसगांवकर