Join us  

'दे दणादण'मधील आवडक्का आता दिसते अशी!, अभिनेत्रीने सांगितले चित्रपटातील मजेशीर किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 1:52 PM

‘हे तर काहीच नाय’ (He tar Kahich Nay)या शोमध्ये प्रेमा किरण (Prema Kiran) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी दे देणादण चित्रपटातील गंमतीशीर किस्से सांगितले.

१९८७ साली दे दणादण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, प्रेमा किरण, निवेदिता सराफ हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटात आवडक्काची भूमिका अभिनेत्री प्रेमा किरण यांनी निभावली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. दरम्यान झी मराठी वाहिनीवरील ‘हे तर काहीच नाय’ या शोमध्ये प्रेमा किरण यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी दे देणादण चित्रपटातील गंमतीशीर किस्से सांगितले. 

नुकतेच हे तर काहीच नाय’ कार्यक्रमात अभिनेत्री प्रेमा किरण यांनी हजेरी लावली होती. त्यांनी नारायण देऊळगावकर यांनी दिग्दर्शित आणि महेश कोठारे यांची निर्मिती असलेला दे दणादण या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या. त्यावेळी प्रेमा यांनी मजेशीर गमती जमती सांगत ‘मी पडले म्हणून दे दणादण हा चित्रपट हिट झाला’ असे वक्तव्य केले. 

तसेच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्री विषयीदेखील सांगितले. प्रेमा किरण म्हणाल्या की, “माझा सिनेमा दे दणादण तुम्हाला माहीतच असेल. तो एक गोल्डन जुबली सिनेमा.” पुढे चित्रपटाविषयी सांगताना त्यातील गाण्यांची आठवण करुन देत त्यांनी ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याचे थोडे बोलही गाऊन दाखवले. पुढे त्यांनी असं सांगितले की, “या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं अशी ताकीद दिली होती.”

त्यानंतर शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती आणि अवघी दोन पावले पुढे जाऊ एवढं पुढे गेल्यावर त्यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. असे प्रेमा या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. याचाही उल्लेख त्यांनी पुढे केला आणि त्या म्हणाल्या की, “मी पडले म्हणून दे दणादण हिट झाला.” प्रेमा किरण यांनी आजवर या सिनेसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. चित्रपटांसह त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील अभिनय केला आहे. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमहेश कोठारे