'लकी' या मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता मयुर मोरे लवकरच 'कोटा फॅक्टरी' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ)वर ही ड्रामा सीरिज पहायला मिळणार आहे. ही कथा आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल याभोवती फिरते. ही सीरिज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवली जाणार आहे.
'कोटा फॅक्टरी' ही वैभव (मयूर मोरे) या १६ वर्षांच्या मुलाची कथा आहे. जेईई पास करून आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न घेऊन वैभव कोटाला आला आहे. मंगळवारी १६ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणाऱ्या कोटा फॅक्टरीमध्ये जितेंद्र कुमार (जीतू), अहसान चन्ना (शिवानी), रेवती पिल्लई (वर्तिका), आलम खान (उदय) आणि रंजन राज (मीना) यांच्याही भूमिका आहेत.
प्राध्यापकांची भूमिका साकारणारे जितेंद्र कुमार म्हणाले, ''कोटा फॅक्टरी'सोबत अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत. हा माझ्यासाठी फारच छान अनुभव होता. कोटामध्ये राहत असताना मी बऱ्याचदा माझ्या शिक्षकांच्या नकला करायचो आणि आम्ही सगळेच त्यावर खूप हसायचो. खरेतर तिथूनच माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीलाही सुरुवात झाली. आता इतक्या वर्षांनंतर कोटातील शिक्षकाची भूमिका साकारताना त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपापसातील वागणे आणि त्यांचे तिथले आयुष्य चोख दर्शवणारा कोटा फॅक्टरी हा अगदी अनोखा शो आहे. या शोमध्ये जे काही समोर येणार आहे, ते दर्शकांना आवडेल, अशी आशा आहे.'