Join us

"घराची दाराची राणी असे ती...", मधुगंधा कुलकर्णीची तिच्या 'घुमा'साठी खास पोस्ट; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 1:19 PM

Madhugandha Kulkarni : सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने नुकतीच तिच्या घरातील घुमासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. कामवाल्या बाईचं विश्व दाखवणाऱ्या या चित्रपटाला महिला वर्गाचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान या चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) हिने नुकतीच तिच्या घरातील घुमासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही घुमा म्हणजे तिची पाळीव कुत्री चिमा. तिच्या वाढदिवसानिमित्ताने मधुगंधाने पोस्ट लिहिली आहे.

मधुगंधा कुलकर्णीने चिमासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, माझी चिमा. आहे माझी घुमा. घराची दाराची राणी असे ती चिमा. तुरुतुरू तिचं चालणं टकामका तिचं पाहणं. पायातला सुस्साट वेग कमी झाला आहे...पण कधी ती गुरगुरणारी आणि फुरफुरणारी आहेच ! आवाजातला दणका तसाच आहे.. तू अशीच आरोग्य संपन्न आणि आखरनंदी राहा... दीर्घायुषी तू आहेसच. हॅप्पी बर्थडे चिमाबाई... घुमाबाई.. लव्ह यू. तिच्या या पोस्टवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

'नाच गं घुमा'बद्दल'नाच गं घुमा' चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव,सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकुळ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. तर स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी 'नाच गं घुमा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली आहे. 

वर्कफ्रंटमधुगंधा कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मालिका, चित्रपट नाटकाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनयाबरोबर ती एक उत्तम लेखिकाही आहेत. तिच्या लेखणीतून साकार झालेला एलिझाबेथ एकादशी चित्रपट चांगलाच गाजला. लेखनाबरोबर तिने अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. तिची निर्मिती असलेला आत्मपॅम्फ्लेट चित्रपट काही महिन्यांपूर्वी भेटीला आला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.