Join us

​झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये माधुरी दीक्षित दिसली या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 8:31 AM

झी चित्र गौरव सोहळ्याची संध्याकाळ असल्याने सगळे कलाकार तयारी करत होते, अचानक एक आलिशान गाडी बॅकस्टेजला येऊन थांबली आणि ...

झी चित्र गौरव सोहळ्याची संध्याकाळ असल्याने सगळे कलाकार तयारी करत होते, अचानक एक आलिशान गाडी बॅकस्टेजला येऊन थांबली आणि सगळ्यांचा नजरा वळल्या, कारण ती गाडी होती बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची. गाडीजवळ एकच गर्दी जमली, माधुरीने सगळ्यांना स्माईल दिली आणि मेकअप रूम मध्ये जाऊन बसली. सगळ्यांसाठी हा एक धक्काच होता. काही वेळात निलेश साबळे आणि श्रेया बुगडे मेकअप रूम मध्ये दाखल झाले. माधुरीने निलेश आणि श्रेया सोबत एका स्किटची रिहर्सल केली, आता वेळ होती स्टेजवर एन्ट्री करण्याची, माधुरीने एका स्किट मधून स्टेजवर एन्ट्री घेतली आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. माधुरीने ज्या कारणासाठी झी चित्र गौरव पुरस्कारात हजेरी लावली होती ते कारण रिव्हील केलं, माधुरीचा पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा झाली त्या चित्रपटाचा नाव आहे “Bucket List”. या वेळी या चित्रपटाचे कलाकारही उपस्थित होते. माधुरीच्या हस्ते मराठी चित्रपटसृष्टीत विशेष योगदानाबद्दल सादिक चितळीकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर उमेश कामत - स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव - पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे - प्राजक्ता माळी यांच्या डान्स परफॉर्मन्सने या सोहळ्यात बहार आणली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि मधू कांबीकर यांना या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तब्येत ठीक नसल्याने मधू कांबीकर येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या सुनेने स्वीकारला. तसेच मराठी पाऊल पडते हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे दिग्दर्शक अमित मसुरकर यांना देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात हम्पी आणि कच्चा लिंबू या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले. सचिन खेडेकर यांना बापजन्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर सोनाली कुलकर्णीला कच्चा लिंबूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.मुरांबा हा या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. Also Read : आशा काळे आणि मधू कांबीकर ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या मानकरी