'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या आणि अशा अनेक मालिका, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार. उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, माधुरीचा हा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत गरीब कुटुंबातून माधुरी वर आली असून तिने तिच्या हिमतीवर तिचं सारं विश्व निर्माण केलं आहे. अलिकडेच माधुरीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दारुच्या नशेत वडील आईला मारहाण करायचे, असं सांगितलं.
या मुलाखतीमध्ये माधुरीने तिच्या आयुष्यात आलेल्या चढउतारांवर भाष्य केलं. एका झोपडपट्टीमध्ये माधुरीचं बालपण केलं. त्यामुळे लहान वयात तिला काय काय सोसावं लागलं हे तिने सांगितलं. लहान असताना कधी पालकांचा मार खाल्लास का? असा प्रश्न माधुरीला विचारण्यात आला होता. त्यावर तिने वडील आईला मारहाण करायचे, असं सांगितलं.
एकदा आई-बाबांचं मोठं भांडण झालं होतं. तेव्हा वडील दारु प्यायचे त्यामुळे त्यांचा स्वत:वर ताबा नसायचा. एका दारुच्या नशेत त्यांनी आईला मारण्यासाठी हात उचलला. त्यामुळे मी मध्ये आले आणि मला जोरात फटका बसला. त्या गोष्टीचं बाबांना खूप वाईट वाटलं. म्हणून त्यांनी स्वत:च्या हाताला इजा करुन घेतली. त्या घटनेनंतर मला कधीच मारलं नाही. आणि,मला तसंही लहानपणी कधी मारलं नव्हतं. आता बाबा दारुही पित नाहीत, असं माधुरी म्हणाली.
दरम्यान, माधुरी सध्या मुंबई सोडून साताऱ्यामध्ये राहात आहे. तिला सातारा सध्या जास्त आवडू लागलं आहे. त्यामुळे ती शुटिंगसाठी सातारा-मुंबई प्रवास करत असते. माधुरीने देवमाणूस, तुझ्यात जीव रंगला या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच रानबाजार या वेबसीरिजमध्येही ती झळकली आहे.