मराठी अभिनेत्री माधुरी पवारला लॉटरी लागली आहे. महेश मांजरेकरांचा बिग प्रोजेक्ट असलेल्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या ऐतिहासिक सिनेमात माधुरीची वर्णी लागली आहे. माधुरीने 'रानबाजार' या सिरीजमध्येही काम केले आहे. तर लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत तिने वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती.
माधुरी अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. तसेच ती नृत्यांगनाही आहे. आता एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाला म्हणल्यावर माधुरी आनंदी आहे. ती म्हणाली, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी या संधीचं नक्कीच सोनं करेन. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. 'ती पुढे म्हणाली, 'वेडात वीर दौडले सात या सिनेमात मी संवेदनशील भूमिका साकारली आहे. ती भूमिका आव्हानात्मक होती. महेश सरांकडून शाबासकीही मिळाली. तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.'
माधुरी पवारने रानबाजरमध्ये अगदी बेधडक भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुकही झाले होते. केवळ सुंदर दिसणे हे ध्यानात न ठेवता माधुरीने अभिनयावर, वेगवेगळ्या भूमिकेंंवर लक्ष दिले.
'वेडात वीर दौडले सात' मध्ये अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता प्रवीण तरडे यांचीही सिनेमात भूमिका आहे. हा सिनेमा मराठी, हिंदीसह आणखी ४ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.