'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या आणि अशा बऱ्याच मालिका, चित्रपट रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार (Madhuri Pawar). उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने रसिकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. नुकतेच माधुरीने लोकमतच्या द अनटोल्ड स्टोरी कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि करिअरमधील अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिने कलाविश्वातील काळी बाजूही सांगितली.
माधुरी पवार म्हणाली की, मी मुंबईत आणि अर्थात या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी आले. उराशी खूप स्वप्न आणि आशा घेऊन मी मुंबईत दाखल झाले होते. पण, इंडस्ट्रीत घडणाऱ्या खूप गोष्टी माणसाला आपण आउटसाइडर आहोत याची जाणीव करून देणाऱ्या घडल्या. मी कोणाचे नाव घेणार नाही कारण, कोणालाही दुखावण्याची भावना माझ्या मनात नाही. पण, एक किस्सा असा आहे. मी एका चित्रपटाच्या मिटींगला गेले होते. मिटींग सुरू झाली. अचानक एक व्यक्ती आली आणि त्यांनी मला सर्कलच्या बाहेर बसायला सांगितले. माझी खुर्ची त्या व्यक्तीने बाहेर काढली. त्यानंतर मी त्या सर्कलच्या बाहेर होते. मला वेगळं बसवलं आणि मिटींगसाठी एक सर्कल तयार झाला. त्यावेळी असे वाटले की ती मिटींग फक्त त्यांच्यासाठी सुरु आहे, तर मग मला कशाला बोलावलं? खरंच मला त्या चित्रपटात काम देणार का? मला त्या भूमिकेबद्दल सांगण्यासाठी बोलावलंय का? असे अनेक विचार मनात आले आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली.
ती पुढे म्हणाली की, त्या सर्कलमध्ये एक खुर्ची सामावून घेऊन बसू शकलो असतो. पण त्या लोकांनी हे केलं नाही. त्यामुळे अशी एखादी मिटींग असेल किंवा एखादी भूमिका साकारायची असेल तेव्हा आपण आउटसायडर आहे असे अनेकदा जाणवते. आपण एखादी भूमिका करण्यासाठी कितीही सक्षम असू तरीही दिल्या जात नाहीत.
मला असं वाटतं की, जरीही तुम्ही इंडस्ट्रीमधले नसाल, आउटसायडर असाल आणि तुमच्यात टॅलेंट असेल तर कितीही असे अनुभव आले तरीही आपण जिद्द न सोडता ठामपणे आपली भूमिका घेतली पाहिजे. एक दिवस नक्की असा येईल जेव्हा आपल्याला न्याय मिळेल. कारण, आतापर्यंत ज्या चांगल्या कलाकृती घडल्या आहेत. त्या अशाच गोष्टीतून घडत असतात. आउटसाइडर म्हणून अशी वागणूक मला अनेकदा मिळाली आहे आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांकडून मिळाली आहे. पण, या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात प्रेरणा म्हणूनच घेतल्या आहेत, असेही तिने यावेळी सांगितले.