Join us  

Madhuri Pawar : लावणी नृत्याच्या नावावर होणाऱ्या अश्लीलतेवरून माधुरी पवार संतापली, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 3:32 PM

स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. 

अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) ही कायम चर्चेत असते. स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. झी युवा वरील 'अप्सरा आली' या डान्स रिॲलिटी शोची विजेती म्हणून माधुरीने तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश कमवले. दिलखेचक अदांनी लावणी सादर करणारी माधुरी ही महाराष्ट्राची आवडती नृत्यांगना आहे, हे या कार्यक्रमात माधुरीने सिध्द करुन दाखवलं. नुकतेच तिनं लावणी नृत्याच्या नावावर होणाऱ्या अश्लीलतेवर भाष्य केलं. 

नुकतेच माधुरी लोकमतच्या 'द अनटोल्ड स्टोरी' कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि करिअरमधील अनेक खुलासे केले आहेत. यावेळी ती म्हणाली, 'मी महाराष्ट्रभर दौरे करत असते. विविध कार्यक्रमात सहभागी होत असते. यातून चांगले अनुभव आले आहेत. पण, आता काही गोष्टी आहेत, त्या थोड्या खटकतात. अश्लीलतेचा वावर सुरू आहे. एखाद्याच्या नावावर पब्लिक जमा होते आहे. मी कधीच पब्लिक म्हणत नव्हते. पण, जेव्हापासून अश्लीता सुरू झाली. तेव्हापासून हा शब्द वापरतेय. पुर्वी असं नसायचं. प्रेक्षकांची गर्दी असायची. पण, आता तर बातम्याचे मथळेही असेच असतात. याला कारणीभूत प्रत्येक जण आहे'. 

माधुरी पुढे म्हणाली,  'मी त्या स्पर्धेचा भाग नव्हते आणि कधीही राहणार नाही. मला गर्दीपेक्षा दर्दी असलेले जास्त आवडतात. माझ्या कार्यक्रमांना आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे की, कुठल्याही कार्यक्रमांना गालबोट लागलं नाही. कधीच कोणता कार्यक्रम रद्द झाला नाही. माझ्या कार्यक्रमांना महिलांची जास्त गर्दी असते. मी कधीच वंगाळपणा केला नाही. आतापर्यंत मी अडीच हजारांपेक्षा अधिक कार्यक्रम केले आहेत. प्रेक्षकांकडून मला खूप प्रेम आलं आहे'.

एखादी गोष्ट ट्रेंडिगला आहे, म्हणून त्यामागे जाणं हे काही पटतं नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली म्हणून त्याकडे जावं.  पण, उगाच एखाद्या गोष्टीपाठी लोंढाच्या लोंढा जाताना पाहायला मिळतोय. यात चेंगराचेंगरी होते, कुणाचा जीव जातो, हे कुणाला कळतं नाही. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. त्यामुळे परत आपल्याला टाळ्या वाजवणारा प्रेक्षक मिळेल. याता यामध्ये पदार्पण करणाऱ्या मुलींना मी एकाच वाक्यात सांगेल की उपाशी पोटातून जेवढी उर्जा बाहेर पडते. तेवढी भरलेल्या पोटातून पडत नाही. त्याच्यासाठी कपडे किंवा अश्लील चाळ्यांवर नाही तर कलेवर कष्ट करावं लागतं, असं माधुरीने म्हटलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीमराठी अभिनेतासिनेमासोशल मीडियानृत्य