Join us

अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण: ...हा तर बहुरूपी कलाकाराचा सन्मान, चित्रपटसृष्टी आनंदली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:15 AM

Ashok Saraf: अशोक सराफ यांनी स्वत:ला कधीच विनोदी अभिनेता मानले नाही. मी विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या. यात विनोदी, नायक, खलनायक, चरित्र भूमिकांचा समावेश होता. पण, लोकांनी विनोद लक्षात ठेवले, असे ते नेहमी सांगतात.

मुंबई - अशोक सराफ यांनी स्वत:ला कधीच विनोदी अभिनेता मानले नाही. मी विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या. यात विनोदी, नायक, खलनायक, चरित्र भूमिकांचा समावेश होता. पण, लोकांनी विनोद लक्षात ठेवले, असे ते नेहमी सांगतात. त्यांनी मराठीत जितकी व्हरायटी दिली तितकी कोणीच दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला, अशी भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे. अशोक सराफ यांनी ५० हिंदी आणि एका भोजपुरी चित्रपटात काम केले.

खतरनाक खलनायक‘दगा’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाला स्त्रिया अक्षरश: शिव्या द्यायच्या. हेच त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचे यश होते. त्यांनी अत्यंत टेरेफीक खलनायक साकारला होता. ‘अरे संसार संसार’ चित्रपटातील त्यांचा व्हिलनही सॉलिड होता, असे असूनही रसिकांनी त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्का मारला.

गावस्करांसोबत खेळले क्रिकेटलिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि अशोक सराफ बालपणी एकत्र क्रिकेट खेळले आहेत. गिरगावातील चिखलवाडीमध्ये अशोक सराफ यांचे बालपण गेले. तिथेच समोर सुनील गावस्करही राहायचे. बालपणीची आठवण जपत कालिदास नाट्यगृहात अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीला सुनील गावस्कर उपस्थित होते. तिथे त्यांनी बालपणीची आठवण सांगितली. 

...यासाठी हिंदीतून घेतला ब्रेकरोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांना खूप भावली; पण त्यापूर्वी त्यांनी हिंदीतील काम खूप कमी केले होते, कारण हिंदीमधील ‘मिलते रहो’ ही संस्कृती त्यांना फार पटली नाही. माझे काम दिसत असल्याने मी कशाला भेटायला जाऊ, असे ते म्हणायचे. 

तबलावादन आणि वाचनअशोक सराफ यांना जशा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतायला आवडते तसेच त्यांचे काही छंदही आहेत. ते उत्तम तबला वाजवतात. मामा प्रसाद सावकारांकडून लाभलेला अभिनयाचा वारसा त्यांनी आजवर जपला. पण, त्यासोबत तबला वादन आणि वाचनासारखे काही छंदही जोपासले.

अबोल कलाकारएखाद्याशी सूर जुळल्याशिवाय ते कधीच कोणाशी मोकळेपणाने बोलत नाहीत. कॅमेऱ्यासमोर भडाभडा बोलणारे आणि अफलातून संवादफेक करणाऱ्या अशोक सराफ यांचा हा स्वभावच आहे. सेटवरही ते काम आटोपल्यानंतर एका कोपऱ्यात निवांत बसतात. सूर जुळल्यावर मात्र ते  दिलखुलासपणे बोलतात. 

टॅग्स :अशोक सराफमराठीसिनेमा