महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदे यांना ३९ आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं. जवळपास १० दिवस सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत पडदा टाकला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या राजकीय घडामोडींची चर्चा सुरु आहे. यामध्ये अभिनेता आरोह वेलणकर याचं ट्विट चर्चेत आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (२९ जून) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर जनतेमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक मराठी कलाकारांनी या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मत मांडली. मात्र, आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत आलं.
'राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण'; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत
काय म्हणाला आरोह वेलणकर?
आरोह ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची घोषणा होताच त्याने या प्रकरणी ट्विट केलं. त्याच्या या ट्विटवर सध्या नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आरोहने लागोपाठ दोन ट्विट केले आहेत. यात त्याने काही वर्षांपूर्वीचा एका जुन्या वर्तमानपत्राचा फोटो शेअर केला आहे.
आरोहचं पहिलं ट्विट
“जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं,” असं ट्विट त्याने केलं. त्याचं हे ट्विट पाहिल्यावर अनेकांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला. मात्र, या टिकास्त्रांकडे दुर्लक्ष करत त्याने आणखी एक ट्विट केलं.
आरोहचं दुसरं ट्विट
“महाराष्ट्राची जनता जिंकली” अशा आशयाचं दुसरं ट्विट त्याने केलं. सध्या आरोहचे हे दोन्ही ट्विट चर्चेत येत आहे. यापूर्वीही आरोहने असंच एक ट्विट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
दरम्यान, राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी पडदा पाडला. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे ज्या संयमाने आणि धीराने भाष्य करत होते त्याचं सर्वस्तरांमधून कौतुक होत आहे. 'उद्धव ठाकरे नेहमी आमच्या मनात राहतील. महाराष्ट्रानं गेल्या अडीच वर्षात आजवरचा सर्वात संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री पाहिला', असं म्हणत नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.