Shiv Sena vs. Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वादळ आलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातील या सद्यस्थितीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. हेमंत ढोमे, आरोह वेलणकर त्यापैकीच एक. अशात मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) पोस्टनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.‘रानबाजार’ या सीरिजचा संदर्भ देत तिने काही इन्स्टा स्टोरी शेअर केल्या आहेत. त्याचा संबंध महाराष्ट्रातील आजच्या परिस्थितीशी जोडला जातोय.
प्राजक्ताने इन्स्टास्टोरीमध्ये ‘रानबाजार’ सीरिजमधील व्हिडीओ शेअर केले आहेत. यात एका व्हिडीओत मकरंद अनासपुरे यांचा संवाद ऐकू येतो. ‘सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा,’ असं मकरंद अनासपुरे बोलतात. त्यानंतर या व्हिडिओमध्ये एका वृत्तनिवेदिकेचा आवाज येतो. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळलं....’, असं ती म्हणते.
महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ... सरकार संकटात... मोठा रानबाजार सुरूच आहे..., अशी काही वाक्ये तिने या व्हिडीओसोबत शेअर केली आहेत. तिच्या या इन्स्टास्टोरीची सध्या जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळीची ही पोस्ट व्हायरल होतेय.
प्राजक्ता माळीची ‘रानबाजार’ ही मराठी वेबसीरिज प्रचंड गाजली. यात प्राजक्ता पहिल्यांदाच प्रचंड बोल्ड अवतारात दिसली.