महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे गौरव मोरे. फिल्टर पाड्याचा बच्चन या नावानेही त्याला आता ओळखलं जातं. गौरव आता मराठी चित्रपटांमध्येही काम करताना दिसतो. सर्वसामान्य परिस्थिती वाढलेल्या गौरवच्या मनात शिक्षण, नोकरी असाच प्लॅन होता. पण, अभिनयाची गोडी लागली आणि आज तो महाराष्ट्रातील जनतेचा लाडका बनला. आज यशाच्या शिखरावर असलेल्या गौरव मोरेचं शिक्षण किती झालंय हे माहितेय का?
गौरव मोरनं नुकतेच 'व्हायफल' युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यानं दहावीला बीजगणितात कॉपी करुन पास झाल्याचं सांगितलं. तो म्हणाला, बीजगणित आणि भुमिती हे विषय होते. मला टेन्शन होतं की हा विषय सुटतोय की नाही? सुटला नसता तर कधीच दहावी निघाली नसती. परीक्षा केंद्र पवईतील आयआयटी कॅम्पस आले होते. तिथं तिथे मान वळवली तरी ओरडायचे'.
पुढे तो म्हणाला, 'नशिबाने परीक्षेवेळी माझ्या पुढे एक मुलगी बसलेली, तिने कंपासवर सगळं लिहून आणलेलं. मी तिला म्हटलं, तू काहीही कर पण मला पेपर दाखव. हा जर पेपर सुटला नाही, तर माझी दहावी कधीच सुटणार नाही, अशाप्रकारे कशीबशी माझी दहावी निघाली'. तर याशिवाय आवडता विषय हिंदी असल्याचं गौरवने सांगितलं. हिंदी विषयाचे सर खूप छान पद्धतीने शिकवायचे, त्यामुळे तो विषय खूप आवडायचा, असे तो म्हणाला.
शिक्षणाबद्दल बोलताना तो म्हणाला, 'दहावीनंतर काय करायचं हेच माहिती नव्हतं. तेव्हा एक गोष्ट सगळीकडे होती की कॉमर्स करा. मग कॉमर्सला प्रवेश घेतला. बारावी झाल्यानंतर BMM साठी अॅडमिशन घेतलं. पण, अभ्यासक्रमात इंग्रजी विषयामुळे ते अवघड जात होतं. पहिल्याच सेमिस्टरला मी नापास झालो. त्यामुळे मग BMM सोडून वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. मला आजही इंग्रजी म्हटलं की भीती वाटते".