परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या दिग्दर्शक-लेखक जोडीचा 'नाच गं घुमा' सिनेमा आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. घराघरात काम करणाऱ्या कामवाली बाई म्हणजेच मदतनीसवर हा सिनेमा आधारित आहे. नम्रता आवटे (Namrata Awate) आणि मुक्ता बर्वे या अभिनेत्रींनी अफलातून काम केलंय. सिनेमाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी नम्रताने एक किस्सा सांगितला.
नम्रता आवटे महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचली. कॉमेडीच्या अचूक टायमिंगने तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तिचं लॉली हे पात्र तर खूपच लोकप्रिय झालं. नम्रता अगदी झोपेतून उठूनही कॉमेडी करु शकते. पण सिनेमात काम करताना दिग्दर्शकाने सांगूनही तिला कॉमेडी करता येत नव्हती. 'लोकमत फिल्मी'शी बोलताना नम्रता म्हणाली, "आमची हास्यजत्रेची टीम आता प्रत्येक घरात जाऊन पोहोचली आहे. पण मोठ्या पडद्यावर अशा प्रकारची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजते. परेश सर मला सुरुवातीला म्हणायचे की नम्रता जरा कॉमेडी कर, आणि मी म्हणायचे सर मला एवढंच कॉमेडी येतं. यापेक्षा जास्त नाही करु शकत. ते एकदा म्हणालेले नमा, किंचीत अजून कॉमेडी केलीस तरी चालेल. मी त्यावर म्हणायचे सर मला किंचीत ते नाही जमत आहे. हे शेवटचं मी एवढंच करु शकते. याउपर मला नाही येत. पण त्यांनी मला खूप कंफर्टेबल करुन घेतलं. मुक्ता बर्वेसारख्या ताकदीच्या अभिनेत्रीने मला खूप सांभाळून घेतलं."
'नाच गं घुमा' सिनेमाची निर्मिती स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी केली आहे. सिनेमात मुक्ता बर्वे, नम्रता आवटेशिवाय सारंग साठे, मायरा वायकूळ, सुकन्या मोने, सुप्रिया पठारे यांचीही भूमिका आहे. सिनेमाचं टायटल साँगही ट्रेंडिंगमध्ये आहे.