सध्या मराठी चित्रपटांची चलती आहे. वेगवेगळ्या धाटणीचे मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यातील अनेक चित्रपट हिट झाले आहेत. अगदी त्यांचा सिक्वलही येत आहे. तसंच मराठी सिनेमांचं लंडन शूटही तेजीत आहे. अनेक सिनेमांचं संपूर्ण चित्रीकरण लंडनला होत आहे. मात्र जेव्हा सिनेमाच्या चित्रीकरणाला लंडनला नेलं जात नाही तेव्हा किती वाईट वाटेल याची खंत नुकतीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखील बनेने (Nikhil Bane) व्यक्त केली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकार निखील बने पहिल्यांदाच सिनेमात भूमिका साकारत आहे. त्याची 'बॉईज' या सुपरहिट फ्रँचायझीच्या बॉईज 4 सिनेमात भूमिका आहे. बॉईज 4 च्या काही भागाचं शूट हे लंडनला झालं आहे. मात्र निखील बनेला लंडनला जाता आलं नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. प्रमोशनदरम्यान 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी लंडनला नव्हतो खरं तर. थोडं वाईट वाटलं. आमचा अख्खा क्रू गेला होता लंडनला. मला असं झालं यार आपणही पाहिजे होतो मजा आली असती. पण त्यांनी सगळ्यांनी मला खूप मिस केलं. गौरव मोरे मला फोन करायचा तुझी खूप आठवण येतीये तू असायला हवा होतास सांगायचा. लंडनशी माझं कनेक्शन आहे पण ते वेगळ्या माध्यमातून. ते कनेक्शन तुम्हाला सिनेमा बघूनच कळेल."
निखिल बनेला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ओळख मिळाली. त्याचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. मोठा कलाकार होऊनही आजही तो भांडूपच्या चाळीत राहतो. आता तर त्याला मराठी सिनेमा मिळाला असून सध्या त्याचं करिअर जोरदार आहे.