Join us

३२ वर्षांपूर्वी आलेल्या 'माहेरची साडी' ने किती केली होती कमाई? तिकीट तर होतं फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:51 AM

'माहेरची साडी' सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता.

सध्या मराठी सिनेमा 'बाईपण भारी देवा' बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. मराठी सिनेमा मोठी उंची गाठतोय हे वाखणण्याजोगं आहे. 'सैराट'पासून सुरु झालेला मराठी सिनेमांचा प्रवास इथपर्यंत आलाय. 'वाळवी', 'वेड', 'झिम्मा' या सिनेमांनी चांगली कमाई केली. शिवाय आता 'बाईपण भारी देवा' ही जोरात सुरु आहे. पण मराठी सिनेमांची दखल खूप पूर्वीच घेतली गेली आहे. ३२ वर्षांपूर्वी 1991 साली आलेल्या 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) सिनेमाने थिएटर दणाणून सोडले होते.

अलका कुबल (Alka Kubal) यांची मुख्य भूमिका असलेला 'माहेरची साडी' सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता. आजही या सिनेमाची आठवण काढली जाते. तसंच सिनेमात अलका यांच्या अस्सल अभिनयाने प्रेक्षक थिएटरमध्येच रडायचे. इतक्या लोकप्रिय सिनेमाने तेव्हा किती कमाई केली असेल असा प्रश्न आपसूकच पडतो. तर 'माहेरची साडी' सिनेमाने त्याकाळी तब्बल 12 कोटींचा व्यवसाय केला होता. होय ९० च्या दशकात या सिनेमाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच अलका कुबल यांना वेगळी ओळखही मिळवून दिली होती.

माहेरची साडीचे तिकीट दर किती होते?

अलका कुबल, विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, रमेश भाटकर यांची मुख्य भूमिका असलेला 'माहेरची साडी' सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला होता. तेव्हा सिनेमाचं तिकीटही आजच्या तुलनेत कैक पटींनी कमी होतं. सिनेमाचा तिकीट दर केवळ चार रुपये इतका होता. 

'माहेरची साडी' प्रभात टॉकिजमध्ये तब्बल 2 वर्ष चालला होता. राजस्थानी चित्रपट 'बाई चली सासरिये' सिनेमाचा तो रिमेक होता. नंतर याचा हिंदीतही रिमेक केला गेला. जुही चावला आणि ऋषि कपूर यांनी 'साजन का घर' या रिमेकमध्ये काम केलं होतं. आता 'माहेरची साडी' चा दुसरा भागही येणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :अलका कुबलमराठी चित्रपटमराठी अभिनेता