१९८७ साली दे दणादण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, प्रेमा किरण, निवेदिता सराफ हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. हाच चित्रपट त्यांनी हिंदी भाषेत देखील बनवला होता. या चित्रपटाचं नाव होत ‘लो मै आ गया’. महेश कोठारें(Mahesh Kothare)ना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. या चित्रपटात गोविंदाचा भाचा विनय आनंद आणि जोडीला लक्ष्मीकांत बेर्डे, मोहन जोशी, रीमा लागू, मकरंद देशपांडे, दीपक शिर्के, प्रेम चोप्रा अशी त्यावेळची दिग्गज स्टारकास्ट होती.
अनेक मराठी चित्रपट सुपरहिट होत असताना हिंदीत देखील आपले नाव होईल आणि पैसा देखील कमावता येईल या आशेने महेश कोठारेंनी १५ वर्षाची मेहनत करून कमावलेले सर्व पैसे या चित्रपटासाठी लावले. ८ जानेवारी १९९९ रोजी ‘लो मै आ गया’ हा चित्रपट रिलीज झाला. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपयशी ठरला. या चित्रपटासाठी लावलेले पैसे देखील तिकिटातून वसूल झाले नाहीत.
ही माझी मोठी चूक होती
महेश कोठारे यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. हा चित्रपट करणे ही माझी मोठी चूक होती, हे स्वत: कोठारेही मान्य करतात. १५ वर्षाची मेहनत या चित्रपटामुळे वाया गेली होती. या चित्रपटानंतर महेश कोठारेंना प्रचंड अपमान, मनस्ताप सहन करावा लागला होता.
तो सर्वात कठीण काळ होता
महेश कोठारेंचे कर्ज इतके वाढले होते की महेश कोठारेंना त्यांचे राहते घर देखील विकावे लागले. यातून सावरायला महेश कोठारेंना १० वर्षांहून अधिक काळ लागला. तेव्हा आदिनाथ देखील लहान होता. आदिनाथच्या शिक्षणावर, करिअरवर त्याचा परिणाम झाला होता. त्याला एमबीए करायचे होते. तो सर्वात कठीण काळ होता, असे महेश कोठारे म्हणाले.