Join us

"राज ठाकरेंनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर राज्याला...", महेश मांजरेकरांचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:56 IST

महेश मांजरेकर यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महेश मांजरेकर हे मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'शिक्षणाच्या आईचा घो', 'दे धक्का', 'फक्त लढ म्हणा', 'मी शिवाजी पार्क' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. अनेक हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन करण्याबरोबरच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांत अभिनयही केला आहे. 

सिनेसृष्टीतील कारकिर्दीबरोबरच महेश मांजरेकर त्यांच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखले जातात. अनेकदा ते आपलं मत अगदी परखडपणे मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना राज ठाकरेंबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. महेश मांजरेकर यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "मी त्याला राजा म्हणतो आणि तो हक्क त्याने मला दिला आहे. मी कधी काही वेगळं बोललो की तो लगेच मला म्हणतो राजा म्हण. त्याच्यासारखा मित्र नाही. कधी अडचणीला फक्त एक फोन लांब असलेला व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी राजा आहे. माझ्या ओळखीतला खऱ्या अर्थाने दिलदार असलेला माणूस म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेला मला या राज्याची घुरा सांभाळताना बघायचं आहे. तो आपल्या राज्याला वेगळा दर्जा मिळवून देईल ही माझी खात्री आहे," असं महेश मांजरेकर म्हणाले. 

दरम्यान, महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेला 'ही अनोखी गाठ' सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. या सिनेमात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगावले मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातही मांजरेकरांनी छोटीशी भूमिका साकारली होती.  

टॅग्स :महेश मांजरेकर राज ठाकरेमनसे