सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हा मुद्दा सध्या भीषण बनत चालला आहे. सेलिब्रिटींना तर हमखास वाईट प्रकारच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. दोन दिवसांपूर्वीच मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने लेकाच्या नावावरुन झालेल्या ट्रोलिंगला वैतागून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असा निर्णय घेतला. आता नुकतंच महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनीही ट्रोलर्सविरोधात कडक पवित्रा घेतला.
'जुनं फर्निचर' या नवीन मराठी सिनेमात महेश मांजरेकर भूमिका साकारत आहेत. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वाढत्या ट्रोलिंगवर रोखठोक मत मांडलं. ते म्हणाले, "मला तर ट्रोलर्सचा भयंकर राग येतो. आज या यंत्राचे फायदे आणि तोटेही आहेत. राग यायलाच पाहिजे असं मला वाटतं. लोक म्हणतात दुर्लक्ष करा. अरे काय दुर्लक्ष करा? कोणी हक्क दिला तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललोय का की तुम्ही मला उत्तर देत आहात. मी सिनेमा बनवतो, तुम्ही पैसे देऊन सिनेमा बघता त्यामुळे तुम्हाला हक्क आहे सिनेमा नाही आवडला असं सांगायचा. माझे पैसे फुकट गेले असं सांगायचा. त्यावर तुम्ही टीका केलीत तर माझं काहीच म्हणणं नाहीए तुम्ही प्रेक्षक आहात आणि मी तुमच्या मताचा आदर करतो."
"मी काही एखादी पोस्ट केली की माझे आईवडील, मुलगी, बायको यांना काहीही बोलण्याचा हक्क मी कोणालाच दिलेला नाही. मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन. माझ्या कामावर टीका करा पण दरवेळेला माझ्या आईला का मध्ये आणता? मी तुम्हाला वैयक्तिक काही बोललोय का? एकदा तर मी माझ्या मुलीबद्दल ज्याने लिहिलं होतं त्याला मी शोधलं. पोलिसात तक्रारही केली. हे कधी संपेल जेव्हा याविरोधात कडक कायदा असेल."
महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. त्यांनी स्वत:च सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आईवडिलांना गृहित धरणाऱ्या मुलाला बाप कसा धडा शिकवतो, मुलाविरोधात थेट कोर्टातच जातो अशी सिनेमाची रोचक कथा आहे. मेधा मांजरेकर, भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर यांचीही सिनेमात भूमिका आहे.