Join us

छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात...;  महेश मांजरेकरांच्या ‘Veer Daudale Saat’चा टीझर पाहिलातं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 2:26 PM

Veer Daudale Saat Teaser Out : महेश मांजरेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर  ‘वीर दौडले सात’चा टीझर शेअर केला आहे. ‘छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर दौडले सात...,’, असं त्यांनी हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे.

Veer Daudale Saat Teaser Out : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक महेश  मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांना नेहमीच असते. अलीकडे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मांजरेकरांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘वीर दौडले सात’ (Veer Daudale Saat) या नावाचा त्यांचा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

 महेश मांजरेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर  ‘वीर दौडले सात’चा टीझर शेअर केला आहे. ‘छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर दौडले सात...,’, असं त्यांनी हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे.

सन 1673...आदिलशहाचा हुकूम घेऊन बहलोल खान निघाला... मोहिम होती छत्रपती शिवाजी महाराजांचा खात्मा करण्याची...महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज... बहलोलचं प्रचंड मोठं सैन्य... समोर छत्रपतींचे मोजकेच मावळे.. तरिही महाराज निश्चिंत होते...कारण सरसेनापती होते कडतोजी उर्फ सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत होते त्यांचे सहा एकनिष्ठ हिरे...बहलोल खानचं काही खरं नव्हतं...वीर दौडले सात..., असं या टीझरमध्ये वाचायला मिळतं.

 ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे.   नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आत्म बलिदान देत इतिहास अजरामर केला होता. याच सर्व लढाईवर हा चित्रपट साकारला जात आहे.

टीझरमध्ये कलाकारांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही. या चित्रपटात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण दिसणार? सहा शिलेदारांची भूमिका कोण साकारणार?   प्रतापराव गुजर यांची भूमिका कोण जिवंत करणार? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.   येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. हिंदीतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :महेश मांजरेकर सिनेमा