मुंबई - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर टीका होत आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.
नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट शुक्रवार १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यातील भडक दृश्यांची चर्चा झाली होती. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती. त्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.
दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करताना महेश मांजरेकर यांनी तितकंच जळजळीत मत मांडलं होतं. मुंबईच्या जंगलातला हा धूर कुणाला सुखासुखी जगून नाय द्यायचा. सगळ्यांची वाट लागणार..! काँक्रीटच्या जंगलातलं वास्तव.. पहा ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर..!, असं म्हणत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता.
तर आता या ट्रेलरवरून वाद झाल्यानंतरही मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या कुत्र्यांना भिडणार दोन लांडगे. काँक्रीटच्या जंगलात राडा सुरु होणार फक्त २ दिवसांत! तिकीट बुकिंग सुरू झालंय, दम असेल तर याच थेटरात, असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.