मकरंद अनासपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. 'दे धक्का', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'गाढवाचं लग्न' अशा विविध सिनेमांच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांनी प्रेक्षकांंना खळखळून हसवलं. इतकंच नव्हे तर 'रंगा पतंगा', 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' अशा सिनेमांच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक प्रश्नांवर सुद्धा बोट ठेवलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा मकरंद अनासपुरेंच्या 'राजकारण गेलं मिशीत' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय.
सध्या चालू असलेल्या राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणारा जेष्ठ ग्रामीण लेखक रा रं बोराडे ह्यांच्या " अगं अगं मिशी " ह्या कथेवर आधारीत "राजकारण गेलं मिशीत" या सिनेमाची चर्चा आहे. बकुळी क्रिएशनची निर्मिती असलेला आणि मकरंद अनासपुरे यांचं दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला चित्रपट येत्या 19 एप्रिल पासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये प्रेक्षकांना मनसोक्त हसवून विचार करायला लावणार हा एक सुंदर मार्मिक सिनेमा आहे.
या अगोदर मकरंद अनासपुरे यांचे राजकीय पार्श्वभूमी असलेले "खुर्ची सम्राट", "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा", "पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा" यासारखे राजकीय विनोदीचित्रपट अतिशय गाजले. तसाच उत्कृष्ट प्रतिसाद याही चित्रपटाला मिळेल याची खात्री मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या टीमने व्यक्त केलेली आहे. या चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने असून छाया दिग्दर्शक सुरेश देशमाने तर संगीत अतुल दिवे यांनी केलंय.