मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. 'दे धक्का', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'गाढवाचं लग्न' अशा विविध सिनेमांच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांनी प्रेक्षकांंना खळखळून हसवलं. मकरंद अनासपुरे यांचे सिनेमे म्हणजे मनोरंजनाची खात्री. मकरंद यांचा आगामी सिनेमा 'राजकारण गेलं मिशीत' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. यानिमित्ताने मकरंद अनासपुरे सध्या विविध माध्यमांत मुलाखती देत आहेत.
मकरंद अनासपुरे यांनी नुकतेच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना 'जर तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय कराल' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मकरंद अनासपुरे म्हणाले, 'एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे कायदे तात्काळ रद्द करू'. मकरंद अनासपुरे यांनी दिलेल्या उत्तराचं त्याचे चाहते कौतुक करत आहेत.
मकरंद अनासपुरे यांचा आगामी 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा रिलीज होत आहे. लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी असताना राजकारणावर भाष्य करणारा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्याच्या राजकारणातले अनेक संदर्भ घेत ते मिश्किलपणे दाखवण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे. जेष्ठ ग्रामीण लेखक रा रं बोराडे ह्यांच्या " अगं अगं मिशी " ह्या कथेवर आधारीत "राजकारण गेलं मिशीत" या सिनेमाची चर्चा आहे. बकुळी क्रिएशनची निर्मिती असलेला आणि मकरंद अनासपुरे यांचं दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला चित्रपट येत्या 19 एप्रिल पासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.