सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या या लोकसभा निवडणुकांसाठी संपूर्ण देशभर राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. ठिकठिकाणी नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. अनेक कलाकारांकडून राजकीय प्रचारसभेत सहभाग घेतला जात आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आता मकरंद अनासपुरे यांनी भाष्य केलं आहे.
मकरंद अनासपुरे यांनी 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'खुर्ची सम्राट' अशा सिनेमांतून राजकारणावर भाष्य केलं. लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मकरंद अनासपुरेंनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना "शरद पवार की उद्धव ठाकरे? आवडतं घराणं कोणतं?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत मकरंद अनासपुरे म्हणाले, "दोन्ही कुटुंब मी इतक्या वर्षांपासून पाहतो आहे. आता ते एकत्र आल्यामुळे पवार घराणे हेच ठाकरे घराणं असं त्याचं एकत्रीकरण झालं आहे. त्यामुळे त्यांच्यात आता वेगळं काही करता येणार नाही. त्यामुळे पवार आणि ठाकरे हे एकत्र झाले आहेत."
या मुलाखतीत त्यांना आवडता युवा नेता कोण? असा प्रश्नही विचारण्यात आला. रोहित पवार, आदित्य ठाकरे की अमित ठाकरे? असे तीन पर्याय देण्यात आले होते. त्यावर मकरंद अनासपुरेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. ते म्हणाले, "त्यांचं काम पाहिल्यानंतर मी यावर उत्तर देईन. त्यांनी आता काम सुरू केलं आहे. पाया भक्कम असेल तरच इमारतीचा डोलारा उभा राहू शकतो."