Join us

मकरंद अनासपुरेंचा मुलगा अभिनयात करिअर करणार? म्हणाले "तो तलवारबाजीचं प्रशिक्षण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:58 IST

मकरंद अनासपुरे हे नुकतंच त्याचा मुलगा इंद्रनीलसोबत एका कार्यक्रमात पोहचले होते.

Makarand Anaspure: आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure). मराठी चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्वत:च्या अभिनयाची छाप प्रेक्षकवर्गावर निर्माण केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जादू पाहिल्यानंतर त्यांच्या लेकाला पडद्यावर पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. नुकतंच मकरंद अनासपुरे यांनी लेकाच्या (Makarand Anaspure Son Indraneil) आवडी-निवडी सांगितल्या. 

मकरंद अनासपुरे हे नुकतंच त्याचा मुलगा इंद्रनीलसोबत गुढीपाडव्यानिमित्त 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायु' या कार्यक्रम पोहचले होते. यावेळी इट्स मज्जाशी मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या मुलानं संवाद साधला. यावेळी बाबांबरोबर कार्यक्रमांमध्ये येतो, तेव्हा तुला कसं वाटतं असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. उत्तरात इंद्रनील म्हणाला, "खूप भारी वाटतं. ज्या कलाकारांना पाहतो त्यांना भेटायला मिळतं. तसं मी बाबांबरोबर फार कार्यक्रमांना येत नाही. आता कुठे त्यांच्याबरोबर यायला सुरुवात केली आहे. खूप मजा येते". तसेच इंद्रनीलनं बोलताना मकरंद यांची 'दे धक्का'मधील भूमिका आवडतं असल्याचं सांगितलं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात येणार का याबद्दलही त्यानं भाष्य केलं. तो म्हणाला,  "मला हे क्षेत्र आवडतं. पण याच क्षेत्रामधून पुढे करिअर करेन इतकी आवड नाही".

मुलाबद्दल बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले,  “जे काही तो करेल, ते त्याने चांगलं करावं. याच सदिच्छा मी देऊ शकतो. तो जी गोष्ट निवडेल त्यासाठी मी त्याला कायमच पाठिंबा देईन. मी त्याच्यावर कोणतीच गोष्ट लादणार नाही. कारण माझा तो स्वभाव नाही". नवीन वर्षाचा संकल्पाबद्दल ते  म्हणाले, "आम्ही दोघंही सुर्यनमस्कार, बैठकांचा व्यायाम करतो. हा व्यायाम दिवसागणिक वाढावा असं मला वाटतं. तो फुटबॉल खळतो. त्याची त्याला आवड आहे. शिवाय तलवारबाजीचं प्रशिक्षण तो घेत आहे. तर हे सगळं जोरदार व्हावं अशी माझी इच्छा आहे". 

टॅग्स :मकरंद अनासपुरे