लकी चित्रपटाचे पहिले गाणे ‘कोपचा’ नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या गाण्याव्दारे लकीच्या निर्मात्यांनी 1983मध्ये झळकलेल्या जीतेंद्र-श्रीदेवी स्टारर ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट दिले आहे. अमितराजने संगीत दिलेल्या ह्या गाण्याला डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि पॉप क्वीन वैशाली सामंतने गायले आहे. तर अभय महाजन आणि दिप्ती सतीवर हे गाणे चित्रीत झाले आहे. आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी गायलेले हे पहिले मराठी गाणे आहे.
ह्या गाण्याविषयी चित्रपटाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “ माझी पिढी ऐंशीच्या दशकातल्या चित्रपटांवर वाढलीय. आमच्या पिढीचा बप्पीदांच्या गाण्याशी खास ऋणानुबंध आहेच. पण त्यासोबतच जीतेंद्रसरांसाठी माझ्या मनात एक खास जागा आहे. आणि म्हणूनच जीतूसर आणि त्यांच्या गोल्डन एराला समर्पित करणारे कोपचा गाणे आम्ही घेऊन आलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे, हे गाणे रसिकांच्या ओठांवर पटकन रूळेल.”
गाण्याविषयी बप्पी लाहिरी म्हणाले, “सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. 1975ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर ख-या अर्थाने सुरू झाले. आणि मी ‘लकी’ ठरलो. मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही. संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमामूळे मी मराठीत गायक म्हणून पदार्पण करतोय. “
गायिका वैशाली सामंत म्हणाली, “लहानपणी मी बप्पीदांची गाणी खूप ऐकायचे. तेव्हा कोणी मला सांगितलं असतं की, मोठी झाल्यावर एक दिवस मी त्यांच्यासोबत एक डूएट गाईन. तर कधी विश्वासच बसला नसता. हे खरंच स्वप्नवत आहे. एवढ्या मोठ्या संगीतकार-गायकासोबत गाणं गायला मिळाणं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे स्वत:ला खूप लकी समजते, की मला संजयदादाच्या सिनेमात बप्पीदांसोबत हे एक एनर्जेटिक गाणं गाता आलं. “
'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर7' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, अभय महाजन आणि दिप्ती सती स्टारर, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपट 7 फेब्रुवारी 2019ला महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.