Join us

राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? मकरंद अनासपुरे म्हणाले, "मी त्यांना विचारलं होतं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 5:01 PM

'राजकारण गेलं मिशीत' हा नवीन सिनेमा मकरंद अनासपुरे घेऊन आले आहेत. यानिमित्त लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे राजकारणावर चर्चा केली आहे.

मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांचा 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्याच्या राजकारणावर मार्मिक ढंगात भाष्य करणारा हा सिनेमा ते घेऊन आले आहेत. त्यांनी स्वत: सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यानिमित्त त्यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी राजकारणातील घडामोडींवर त्यांनी दिलखुलासपणे मतं मांडली.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं मोठं नाव आहे. बाळासाहेब ठाकरेंना मानणारे अनेक लोक आहेत. मुंबई म्हणजे बाळासाहेब ठाकरे असंच तेव्हा समीकरण होतं. बाळासाहेब यांचे पुत्र उद्धव आणि पुतण्या राज दोघंही राजकारणात आले. जेव्हा राज ठाकरे (Raj Thakre) शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. आज  इतक्या वर्षांनीही राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त होत असते. 

मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नुकतंच यावर त्यांच्याही भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "मराठी माणूस म्हणून मला केव्हाही आनंद होईल. मी एकदा राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांना विचारलं होतं की भावाची कधी आठवण येत नाही का त्रास होत नाही का. मला वाटतं की मराठी माणसांना एकत्र पाहिलं तर आपणही आनंदितच होऊ. माझीही हीच भावना असेल."

मकरंद अनासपुरे यांनी याआधी राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक सिनेमे केले. यामध्ये 'खुर्ची सम्राट', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या सिनेमांचा समावेश आहे. हाही सिनेमा तुम्हाला हसवेल आणि शेवटी अंतर्मुख करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिनेमात प्राजक्ता हणमघर, प्रकाश भागवत, डॉ. विजय देशमुख, डॉ. राजू सोनावणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम, प्रशांत जाधव, विनीत भोंडे, हरीश तिवारी, श्वेता पारखे, उन्नती कांबळे, रेश्मा राठोड, शैलेश रोकडे यांच्याही भूमिका आहेत. १९ एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :मकरंद अनासपुरेराजकारणमराठी अभिनेतामराठी चित्रपटराज ठाकरेउद्धव ठाकरे